नवी दिल्ली : भ्रष्टाचार रोखण्याची जबाबदारी असलेल्या केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) व पारदर्शीपणा राखण्याची जबाबदारी असलेल्या केंद्रीय माहिती आयोगाला (सीआयसी) प्रमुखाविना काम करावे लागत आहे.दक्षता आयुक्त प्रदीप कुमार यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ हे पद सांभाळल्यानंतर राजीनामा दिला. ते माजी संरक्षण सचिव आहेत. त्यांनी हे पद १४ जुलै २०११ रोजी सांभाळले होते. शुक्रवारी कार्यालयाने त्यांना निरोप दिला. सीव्हीसीचे प्रमुख केंद्रीय दक्षता आयुक्त असतात. या पदावर दोन दक्षता आयुक्त असतात. दुसरे दक्षता आयुक्त जे. एम. गर्ग यांचा कार्यकाळ ७ सप्टेंबर रोजी संपला. सरकार नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करेपर्यंत या पदाचा भार माजी आयपीएस अधिकारी राजीव सांभाळतील, असे सूत्रांनी सांगितले. सीव्हीसी आणि सीआयसीच्या नियुक्तीत पारदर्शीपणाचा अभाव आढळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आधीच सुनावणी सुरू आहे. अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी १८ सप्टेंबर रोजी प्रकरण निकाली निघेपर्यंत नव्या नियुक्तीचा विचार करणार नाही, अशी न्यायालयात हमी दिली होती. अंतिम सुनावणी १४ आॅक्टोबर रोजी होईल. दुसरीकडे लोकसभेत विरोधी पक्षनेता नसल्याने सीआयसी अध्यक्षाविना काम करीत आहे. या पदाच्या निवड समितीत विरोधी पक्षनेता सदस्य असतो. मुख्य माहिती आयुक्त राजीव माथूर यांचा कार्यकाळ २२ आॅगस्ट रोजी संपला. इंटिलिजेन्स ब्युरोचे माजी प्रमुख राहिलेले माथूर यांनी २२ मे रोजी सहावे मुख्य सूचना आयुक्त म्हणून पदभार सांभाळला होता. राष्ट्रपती हे तीन सदस्यांच्या निवड समितीच्या शिफारशीनंतर सीआयसीची नियुक्ती करतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सीव्हीसी, सीआयसी अध्यक्षाविना!
By admin | Updated: September 29, 2014 06:03 IST