Spying For Pakistan: भारत-पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्षानंतर राष्ट्रीय तपास संस्था, गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील संशयितांचा धांडोळा घेतला. यात अनेकजण पाकिस्तानचे हेर असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. एनआयएने आता आणखी एका हेराला अटक केली असून, तो २०२३ पासून पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला माहिती पुरवत होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एनआयएने एक निवेदन जारी करून या अटकेती माहिती दिली आहे. एनआयएने म्हटले आहे की, संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला पुरवल्याप्रकरणी सीआरपीएफच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला माहिती देणारा तो कोण?
एनआयएने सांगितले की, हेरगिरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोती राम जाट असे आहे. तो हेरगिरी प्रकरणात सक्रिय असल्याचे आढळून आले. त्याने राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील अतिमहत्त्वाची आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्याला पुरवली आहे.
वाचा >>मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ
पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याकडून मिळाले पैसे
२०२३ पासून मोती राम जाट हा पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला माहिती पुरवत होता. आरोपी मोती राम जाट याला पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे मिळाले असल्याचेही आढळून आले आहे, अशी माहितीही एनआयएने दिली आहे.
दिल्लीत केली अटक
एनआयएने मोती राम जाट याला दिल्लीत अटक केली. त्याची सध्या चौकशी केली जात आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पटियाला हाऊस कोर्टातील विशेष न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.