कच्च्या मालाच्या टंचाईमुळे काजू प्रक्रिया उद्योग अडचणीत आजरा - चंदगडमधील परिस्थिती : बेरोजगारी वाढणार
By admin | Updated: May 12, 2014 22:13 IST
* सध्या काजू बियांचा दर ८५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला
कच्च्या मालाच्या टंचाईमुळे काजू प्रक्रिया उद्योग अडचणीत आजरा - चंदगडमधील परिस्थिती : बेरोजगारी वाढणार
* सध्या काजू बियांचा दर ८५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला* विभागात काजूवर प्रक्रिया करणारे ३५० उद्योग* टांझानिया, ब्राझील, मलेशिया, व्हिएतनाम येथूनही काजूबिया आयातज्योतिप्रसाद सावंत / आजरा : आजरा-चंदगड तालुक्यात काजू उत्पादनात यावर्षी प्रचंड घट झाल्याने काजू प्रक्रिया उद्योग अडचणीत आले असून, उद्योग चालकांना आर्थिक फटक्यास तर कामगार वर्गास बेरोजगारीस सामोरे जावे लागणार आहे.प्रतिकूल हवामानामुळे यावर्षी काजू उत्पादन कमालीचे घटले आहे. सद्य:स्थितीत काजूबियांचा दर ८५०० रुपये प्रतिक्विंटलच्या घरात जाऊन पोहोचला आहे. प्रतिवर्षी या भागात सुमारे पाच हजार टन काजू बाजारपेठेत उपलब्ध होतो. यावर्षी हेच प्रमाण तीन हजार टनाच्या आसपास आहे. या विभागात काजूवर प्रक्रिया करणारे ३५० लहानमोठे उद्योग उभे आहेत. उद्योग उभा करणार्यांमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. स्थानिक काजूबियांबरोबरच गोवा, सिंधुदुर्ग व बेळगाव येथूनही काजूची आयात मोठ्या प्रमाणावर होते. यावर्षी काजूबियांचे दर दीडपट वाढल्याने बिया खरेदीसाठी गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. एकीकडे स्थानिक काजूची अशी स्थिती असताना दुसरीकडे टांझानिया, ब्राझील, मलेशिया, व्हिएतनाम येथून काजूबिया आयात होत आहेत. भारतीय काजूबिया तुलनेने दर्जेदार असल्या तरी आयात काजू स्वस्त मिळत असल्याने सर्रास अशा काजूबिया खरेदीकडे मोठ्या उद्योजकांचा कल आहे.स्थानिक बाजारपेठेतून खरेदी केलेल्या काजूबियांपासून तयार झालेला काजूगर व आयात बियांपासून तयार होणारा काजूगर याचा एकच दर असल्याने तुलनेने दर्जा कमी असला, तरी आयात बियांपासून काजूगर निर्मिती करणे फायदेशीर ठरत आहे.आजरा-चंदगड भागात पाच ते सात हजारांच्या आसपास या उद्योगातून प्रत्यक्षरीत्या, तर पाच हजाराच्या घरात अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध होत आहे. यावर्षी मात्र कच्च्या मालाच्या टंचाईमुळे वर्षभर काजू उद्योग बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.