चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या सुटीत वकिलांनाच काम करायचे नाही. यानंतरही प्रलंबित खटल्यांसाठी न्यायालयालाच दोषी धरले जाते, अशी खंत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केली. मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठापुढे एक प्रकरण सुनावणीस आले होते. संबंधित प्रकरणाची सुनावणी उन्हाळ्याच्या सुटीनंतर घेण्यात यावी, अशी विनंती एका वकिलाने केली. गवई यांनी वकिलाच्या या व्यवहारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायमूर्ती उन्हाळ्याच्या सुटीतही काम करीत आहेत. यानंतरही प्रलंबित खटल्यांची संख्या वाढण्यासाठी न्यायालयाला दोषी ठरविले जाते. मात्र, सुट्यांमध्ये वकिलांनाच काम करायचे नाही, असे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयात ८२,८३१ खटले प्रलंबित आहेत. आतापर्यंतच्या प्रलंबित प्रकरणांची ही सर्वात मोठी संख्या आहे. गेल्या एका वर्षात २७,६०४ प्रलंबित प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
उन्हाळ्याच्या सुट्टीतही होणार कामकाजसर्वोच्च न्यायालयाने उन्हाळ्याच्या सुटीत २६ मे ते १३ जुलै या कालावधीत आंशिक स्वरूपात कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात दोन ते पाच खंडपीठ दररोज काम करणार आहे. यात स्वतः सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासह पाच सर्वोच्च न्यायाधीशांचा समावेश आहे. यापूर्वी, उन्हाळ्याच्या सुटीत फक्त दोन पीठ कार्यरत असायचे. मात्र त्यात ज्येष्ठ न्यायमूर्तींचा समावेश नसायचा. आता सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्री कार्यालय सुद्धा १० ते ५ सुरू राहणार आहे.