काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लष्कराबाबत केलेल्या कथित विधानावरून सर्वोच्च न्यायालायने त्यांना खडेबोल सुनावले होते. तसेच चीनने भारताची दोन हजार चौरस किमी जमीन बळकावली हे तुम्हाला कसं समजलं? तुम्ही खरे भारतीय असता तर असे बोलला नसता, अशा शब्दात न्यायमूर्तींनी राहुल गांधी यांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी त्यांचा बचाव केला आहे.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, माननीय न्यायमूर्तींचा पूर्ण सन्मान ठेवून मी सांगू इच्छिते की, खरा भारतीय कोण आहे हे न्यायमूर्ती ठरवू शकत नाही. कोण खरा भारतीय आहे, कोण खरा भारतीय नाही हे न्यायालय ठरवू शकत नाही. हा विषय त्यांच्या कार्यकक्षेत येत नाही. राहुल गांधी यांच्या मनात लष्कराप्रति पूर्ण आदर आणि सन्मान आहे. माझा भाऊ कधीही सैन्याविरोधात बोलणार नाही. तो त्यांच्या प्रति आदर बाळगतो. तसेच त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला.
राहुल गांधी यांनी लष्कराबाबत केलेल्या कथित वक्तव्याप्रकरणी खालच्या कोर्टाने त्यांच्याविरोधात समन्स बजावले होते. मानहानीच्या या खटल्याविरोधात राहुल गांधी यांनी आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.या खटल्याची सुनावणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झाली. त्यावेळी राहुल गांधी यांना फटकारताना सर्वोच्च न्यायालयाने चीनने दोन हजार चौरस किमी जमीन बळवकावली, हे तुम्हाला कसे कळले. तुम्ही खरे भारतीय असता तर असं विधान केलं नसतं, असे न्यायमूर्ती म्हणाले होते.