जगभरात कोरोनाचं थैमान वाढतंच असून भारतातही कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशात अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. भारतातही इटलीमध्ये झाली तशी स्थिती होऊ शकते, अशी एक चर्चा ऐकायला मिळते. प्रत्येक राज्य आपापल्या पद्धतीने कोरोना रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना करत आहे. मात्र, राजस्थाननं कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आपलं एक खास मॉडेल तयार केलं असून त्याचं देशभरातून कौतुक केलं जात आहे. हेच मॉडेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये राबवला आहे.
कोरोना विरोधातील हे खास मॉडेल म्हणजे 'भिलवाडा मॉडेल'. देशातलं पहिलं कोरोना हॉटस्पॉट भिलवाडा होतं. मात्र, आता इथली स्थिती अशी आहे की, येथील सर्व २७ रूग्णांपैकी १३ कोरोनाचे रूग्ण बरे होऊन घरी परतलेत. त्याहूनही दिलासादायक बाब म्हणजे गेल्या आठ दिवसांत एकही नवीन पेशंट सापडला नाही. एवढंच नाही तर चार राज्यं आणि १५ जिल्ह्यांत संक्रमणही थांबवण्यात राजस्थानला यश आलंय. पण हे सगळं शक्य कसं झालं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
भिलवाडा मॉडेल आता देशभर लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रानं स्वतःहून या मॉडेलची माहिती मागवली आहे. द प्रिंटच्या एका बातमीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार अमरजीत सिन्हा यांनासुद्धा भिलवाडा मॉडेलनं खूप प्रभावित केलंय.
एका माहितीनुसार, ६ एप्रिलपर्यंत २७०८ नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील २७ नमुने पॉझिटिव आढळून आले. यापैकी १३ लोक बरे होऊन घरी परतलेत. दोन जणांचा मृत्यू झालाय. आता फक्त तीन जण पॉझिटिव राहिलेत. उर्वरित सात जणांचा रिपोर्ट निगेटिव आल्यावर त्यांनाही घरी सोडलं जाणार आहे.
भिलवाड्यात कोरोना शिरला कसा?
राजस्थान एका वृत्तपत्रानुसार, १९ मार्चला भिलवाड्यात ब्रिजेश बांगड मेमोरिअल हॉस्पिटलमधील तीन डॉक्टर आणि नर्स यांना कोरोना वायरसची लागण झाल्याचं समोर आलं. पण परदेशी दौऱ्याची त्यांची कुठलीही ट्रॅवल हिस्ट्री नव्हती. पण ५२ वर्षाच्या न्यूमोनियाच्या रूग्णाचा १३ मार्चला मृत्यू झाला होता. त्याची कोरोना टेस्ट काही झाली नव्हती. नंतर उदयपूरला ९ मार्चला होळी खेळायला गेलेला बांगड हॉस्पिटलमधील डॉक्टर या पेशंटच्या संपर्कात आल्याचं पुढे समजलं. नंतर संपूर्ण स्टाफला क्वारंटाईन केलं. काही दिवसांनी या सगळ्यांचे टेस्ट रिपोर्ट आले. त्यातील १२ जण कोरोना पॉझिटिव आढळले.
काय आहे भिलवाडा मॉडेल?
राजस्थानमधील 10 जिल्हे हे कोरोनाने प्रभावित आहेत. त्यातील पाच शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. आनंदाची बाब म्हणजे जयपूर येथील एसएमएस हॉस्पिटलमधून 5 कोरोनाची लागण झालेले रूग्ण 10 दिवसात बरे होऊ घरी परत गेले. अशात प्रशासनाने याला आळा घालण्यासाठी काम सुरू केलं. भिलवाड्याच्या साऱ्या बॉर्डर्स सील केल्या आणि कोरोनाला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाने सहा कलमी कार्यक्रम हाती घेतला. त्यानंतर भिलवाड्यात हे सुरू असताना देशात कोरोनाचे ४६० पेशंट सापडले होते. तर ९ जण दगावले होते.
1) जिल्ह्याला आयसोलेशनमधे टाकणं, 2 ) हॉटस्पॉट ओळखणं, 3) घरोघरी जाऊन सर्वे करणं, 4) पॉझिटिव पेशंटच्या कॉन्टॅक्टमधल्या लोकांना काही करून शोधणं, 5) क्वारंटाईन, आयसोलेशन सुविधा वाढवणं आणि 6) ग्रामीण भागात यंत्रणा सज्ज ठेवणं.
राजस्थानचे अतिरिक्त मुख्य सचिव रोहित कुमार सिंग सांगतात, ‘२२ मार्च ते २ एप्रिल या काळात प्रत्येक घरात जाऊन ४.४१ लाख कुटुंबांचा सर्वे करण्यात आला. १,९३७ आरोग्य पथकांनी हे काम केलं. यात २२ लाख ३९ हजार लोकांकडून आरोग्यविषयक माहिती जमवण्यात आली. यातील १४ हजार लोकांमधे फ्लू सारखी लक्षणं आढळली. त्यांची एक यादी तयार केली आणि या लोकांची दिवसातून दोनदा याची माहिती घेतली.‘
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे येथील प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाची टेस्ट करण्याची व्यवस्था करण्यात आली. जनतेला सोबत घेऊन येथील प्रशासनाने कोरोना मात देण्यासाठी लढा उभारला.
राजस्थान सरकारनं हॉटस्पॉट ओळखून चटकन शहराच्या साऱ्या बॉर्डर सील केल्या. भिलवाडा शहरातही लॉकडाऊन लागू करण्यात आला. असं करणारं भिलवाडा हे देशातलं पेहिलं शहर आहे. तसेच गांभीर्य ओळखून राज्यभरातून १६ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना भिलवाड्याला पाठवलं.
त्यानंतर येथील पाच मोठी हॉस्पिटल्स अत्यावश्यक सेवेसाठी राखीव करून घेण्यात आलीत. नंतर भिलवाडा आणि आजूबाजूच्या परीसरात जास्तीत जास्त लोकांची टेस्ट केली गेली. 9 दिवसात तब्बल 24 लाख लोकांची टेस्ट करण्यात आली. टेस्टचा हा देशातील सर्वात मोठा आकडा आहे. तसेच ज्या लोकांना काहीच झाले नाही त्याच्यांवर सॅनिटायजरने फवारणी करण्यात आली आहे. कोरोनामुळे रूग्ण दगावला तर हॉस्पिटल, त्याचं घर आणि परीसर सॅनिटाइझ केला गेला.
जे संशयित रूग्ण होते त्यांना थ्री-स्टार हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. तर 6554 लोकांना त्यांच्या घरात विलगीकरण करण्यात आलं. आणि एका अॅपच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याबाबत रोज माहिती घेण्यात आली. घरातील व्यक्ती बाहेर पडली तर अॅपवर अलर्ट येण्याची देखील व्यवस्था होती.
अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी इथे ठराविक वेळ ठरण्यात आली आहे. सकाळी 7 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 7 या वेळेत वस्तू खरेदी केली जात होती. पण जिल्हाधिकारी भट्ट यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘३ ते १३ एप्रिलपर्यंत जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांसह सगळीचं दुकानं पूर्णतः बंद राहतील.
राजस्थान पत्रिका वृत्तपत्रात ७ मार्चला आलेल्या बातमीनुसार, सध्या ९५० लोक क्वारंटाईनमधे आहेत. ७६२० लोकांना आयसोलेशनमधे ठेवण्यात आलंय. २० फेब्रुवारी ते हॉस्पिटल सील करेपर्यंत बांगड हॉस्पिटलमधे ६,१९२ पेशंट तपासण्यात आले होते. हे सर्व पेशंट राज्यातल्या १५ जिल्ह्यांतून आले होते. तसंच ३९ पेशंट हे हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतले होते. राजस्थाननं व्यवस्थित नियोजन केलं नसतं तर कदाचित राजस्थानसहीत या राज्यांनमध्येही कोरोनाने थैमान घातलं असतं.