नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे भारतासह दक्षिण आशियाई देशातील पाच वर्षांहून कमी वयाची आणखी १२ कोटी मुले पुढील सहा महिन्यांत दारिद्र्याच्या खाईत लोटली जाऊन त्यांचे आरोग्य धोक्यात येईल, अशी चिंता मुले व महिलांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या ‘युनिसेफ’ या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेने ताज्या अहवालात व्यक्त केली आहे.‘युनिसेफ’च्या भारतातील प्रतिनिधी यास्मिन हक हा अहवाल प्रसिद्ध करताना म्हणाल्या की, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मालदिव व श्रीलंका या दक्षिण आशियाई देशात समाजातील खालच्या स्तरातील कुटुंबांची रोजीरोटी बंद झाल्याचा फटका त्यांच्या मुलांना सर्वाधिक बसत आहे. सध्याच्या महामारीने यात आणखी १२ कोटींची भर पडून अशा संकटग्रस्त मुलांची संख्या ३६ कोटींवर पोहोचेल. अमेरिकेतील जॉन हॉफकिन्स ब्लूमबर्ग स्कूल आॅफ पब्लिक मेडिसिनने केलेल्या अभ्यासाचा हवाला देत अहवाल म्हणतो की, वाईटात वाईट परिस्थितीत दक्षिण आशियात पाच वर्षापर्यंतच्या वयाच्या ८.८१ लाख जास्त मुलांचा व ३६ हजार मातांचा पुढील वर्षभरात मृत्यू ओढवू शकेल. यापैकी सर्वाधिक मृत्यू भारत व पाकिस्तानातसंभवतात.>पोषण आहार, आर्थिक तरतुदीची मोठी गरजहक म्हणाल्या की, भारतापुरते बोलायचे तर बालकांचे कुपोषण ही येथे मोठी समस्या आहेच. सध्याच्या संकटामुळे यात भर पडणार आहे. त्यामुळे आंगणवाडी यंत्रणा अधिक मजबूत करून बालकांना पोषण आहार पुरविण्याची व त्यासाठी अधिक तरतूद व अधिक सोय करण्याची गरज आहे.
CoronaVirus News : कोरोनामुळे १२ कोटी मुले दारिद्र्याच्या खाईत जातील, ‘युनिसेफ’च्या अहवालात चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:28 IST