नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा खंडित करू नका, असं निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्वच राज्यांना दिले आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भाल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात ऑक्सिजनच्या पुरवठ्याकडे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. कोरोना व्हायरसच्या दृष्टीने ऑक्सिजनचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आवश्यक वस्तूंच्या यादीमध्ये करण्यात आला आहे, त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या उपचारात त्याची कमतरता भासू देऊ नका, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. कर्मचार्यांना घरोघरी ऑक्सिजन युनिट्स नेण्याची सुविधाभल्ला यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, लॉकडाऊनसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांद्वारे सर्व प्रकारच्या वैद्यकीय पुरवठा साहित्य व उपकरणे तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गॅस आणि लिक्विड ऑक्सिजन निर्माण करणारी सर्व उत्पादक युनिट, ऑक्सिजन सिलिंडर्सचे उत्पादन करणारे युनिट आणि त्यांची वाहतूक एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी करणाऱ्यांना कोणतीही बाधा येता कामा नये. तसेच ऑक्सिजन युनिट्सचा पुरवठा सुनिश्चित केला जावा. या पत्राद्वारे त्यांनी कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन युनिट त्यांच्या घरातून कारखान्यात नेण्याची परवानगी दिली आहे. परंतु संबंधित कामात सामाजिक अंतर राखणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
coronavirus : कोरोनाग्रस्ताच्या उपचारात ऑक्सिजनचा तुटवडा भासू देऊ नका; केंद्राचे राज्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 22:43 IST