Coronavirus: महाराष्ट्रातील 'या' ५ हॉस्पिटल्सना ‘प्लाझ्मा’च्या चाचणीसाठी परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 01:08 AM2020-05-09T01:08:17+5:302020-05-09T01:08:27+5:30
यात महाराष्ट्रातील पाच, गुजरातमधील चार, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तामिळनाडूतील प्रत्येकी दोन आणि कर्नाटक, तेलंगणा, पंजाब आणि चंदीगडमधील प्रत्येकी एका इस्पितळाचा समावेश आहे.
एस.के. गुप्ता
नवी दिल्ली : कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पद्धती किती सुरक्षित आणि प्रभावी आहे, याचे आकलन करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने महाराष्ट्रातील पाच इस्पितळांसह देशभरात २१ इस्पितळांना चिकित्सालयीन चाचण्यांसाठी (क्लिनिकल ट्रायल) मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात दहा राज्यांतील २१ इस्तिपळांना क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगी देण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील पाच, गुजरातमधील चार, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, तामिळनाडूतील प्रत्येकी दोन आणि कर्नाटक, तेलंगणा, पंजाब आणि चंदीगडमधील प्रत्येकी एका इस्पितळाचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील बी.जे. मेडिकल कॉलेज, पूना हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर (पुणे), सर एच.एन. रिलायन्सन फाऊंडेशन हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च (मुंबई), राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (कोल्हापूर), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर या पाच इस्पितळांचा यात समावेश आहे.