नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30 हजारांहून नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. हसती-खेळती घरं कोरोनामुळे कोलमडून गेली आहेत. घरातील सदस्यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपल्याने 6 मुलं अनाथ झाली आहे.
मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यामध्ये अमाहा गावात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कुटुंबाची वाताहत झाली आहे. कोरोनामुळे घरातील कर्त्या मंडळींचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आधी वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आईला देखील जीव गमवावा लागला आहे. अवघ्या काही महिन्यांत दोघांचाही मृत्यू झाल्याने सहा मुलं आता पोरकी झाली आहेत. सर्वात मोठी मुलगी ही सात वर्षांची आहे. तर सर्वात लहान चिमुकला अवघा आठ महिन्यांचा आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने मुलीवर मदत मागण्याची वेळ आली आहे.
भावंडांचं पोट भरण्यासाठी सात वर्षीय मुलगी गावातील घराघरात जाऊन अन्न मागत आहे. पतीच्या मृत्यूनंतर मुलांची आई घर चालवत होती. पण कोरोनाने तिचाही मृत्यू झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पण आता नातेवाईकांनी देखील मुलांकडे पाठ फिरवली आहे. मुलांकडे गावात राहण्यासाठी नीट घरही नाही. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य हे गावाच्या बाहेर राहतात. मध्य प्रदेश सरकारने मदत जाहीर केली आहे, मात्र मुलांकडे कोणतीही कागदपत्र, ओळखपत्र नसल्याने त्यांना मदत मिळण्यास अडचण येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
संकटं संपता संपेना! कोरोनानंतर ब्लॅक फंगसचा धोका अन् आता बेल्स पॉल्सी ठरतोय घातक; चिंतेत भर
कोरोनानंतर ब्लॅक फंगसचा धोका निर्माण झाला आहे. तसेच आता बेल्स पॉल्सी देखील घातक ठरत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनातून ठिक झाल्यानंतर देखील कोरोना रुग्णांची पाठ सोडत नाही. म्युकोरमायकोसिसनंतर आता बेल्स पॉल्सीचा सर्वाधिक धोका पाहायला मिळत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत याचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईत राहणाऱ्या 55 वर्षीय एका व्यक्तीला 24 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली. मात्र उपचारानंतर ते ठीक झाले. 31 जुलै रोजी त्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस देखील घेतला आहे. लस घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या व्यक्तीच्या कुटुंबाला त्याच्या चेहऱ्यावा लकवा मारलेला दिसला. त्यांना उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर सध्या त्यांच्यावर उपचार करत आहेत.