नवी दिल्ली : यापुढे होणाऱ्या लोकसभा व राज्य विधानसभांच्या सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकांमध्ये देशातील सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसोबत (ईव्हीएम) केलेल्या मतदानाची लेखी पावती देणारी ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रेही उपलब्ध करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्धार असून यासाठी लागणारी सर्व यंत्रे येत्या नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध होतील, असा विश्वास आयोगाने व्यक्त केला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लागणारी जास्तीची ‘ईव्हीएम’ यंत्रे (१३.९५ लाख बॅलट युनिट व ९.३ लाख कंट्रोल युनिट) यंदाच्या सप्टेंबरपर्यंत व १६.५ लाख ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे नोव्हेंबरपर्यंत हाती येतील. त्यामुळे निवडणुकीची तयारी सुरु होण्याआधीच ही यंत्रे उपलब्ध झालेली असतील, असे आयोगाने बुधवारी एका निवेदनात स्पष्ट केले.सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदानकेंद्रांवर पुरविण्यासाठी १६.१५ लाख ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे लागतील हे लक्षात घेऊन तेवढ्या यंत्रांची मागणी बंगळुरु येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. आणि हैदराबाद येथील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आॅफ इंडिया या दोन सरकारी कंपन्यांकडे गेल्या वर्षी मे महिन्यात नोंदविली होती. ही सर्व यंत्रे या कंपन्यांकडून सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होतील, असे आश्वासन आयोगाने सर्वोच्च न्यायालयात एका प्रतिज्ञापत्रात दिले होते. मात्र सर्व यंत्रे मिळण्यास आता थोडा विलंब होणार आहे, हे आयोगाने मान्य केले.आत्तापर्यंत या दोन कंपन्यांनी मागणीच्या ३६ टक्के म्हणजे ५.८८ लाख ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचे उत्पादन केले आहे. राहिलेली १०.२७ लाख यंत्रे नोव्हेंबर २०१८ अखेरपर्यंत उत्पादित करून ती विविध राज्यांकडे पाठविली जातील, असे आश्वासन या दोन्ही कंपन्यांनी आयोगास दिले आहे. कंपन्यांनी सुरुवातीस पुरविलेल्या ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचे तांत्रिक तज्ज्ञ समितीने मूल्यमापन केले व त्यात काही सुधारणा सुचविल्या. त्यामुळे थोडा विलंब झाला असला तरी आता राहिलेली सर्व यंत्रे वेळेत उपलब्ध होतील यासाठी आयोग रोजच्या रोज कंपन्यांवर लक्ष ठेवून आहे.११६ निवडणकांचा अनुभवमतदानासाठी कागदी मतपत्रिकेऐवजी मतदानयंत्रांचा वापर सुरु झाल्यापासून गेल्या २० वर्षांत आयोगाने ‘ईव्हीएम’ यंत्रे वापरून लोकसभेच्या तीन व राज्य विधानसभांच्या ११३ सार्वत्रिक निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. गेल्या वर्षी जूनपासून आयोगाने सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकांमध्ये ‘ईव्हीएम’सोबत ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचा वापरही सुरु केला आहे. भविष्यातील सर्व निवडणुकांमध्ये देशभर सर्व मतदानकेंद्रावर मतदानासाठी ही दोन्ही यंत्रांचा वापर करण्याचा आयोगाचा निर्धार आहे.
आगामी निवडणुकांमध्ये देशात सर्वत्र ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:33 IST