नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वावरून वेगवेगळे कयास लावले जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसने इंडिया आघाडीचे नेतृत्व सोडण्यास तयार राहावे, असा सल्ला दिला आहे. ज्या कुणाला याचे नेतृत्व करायचे आहे त्यांना करू द्यावे, असे सांगून ममता बॅनर्जींसह इतर पक्षांतील अनेक नेत्यांत ही पात्रता असल्याचेही अय्यर यांनी नमूद केले.
एका माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत अय्यर यांनी म्हटले आहे की, इंडिया आघाडीचे नेतृत्व कुणाकडे असावे याची चिंता करण्याची गरज नाही. कारण काँग्रेस आणि या पक्षाच्या नेत्यांची भूमिका हा पक्ष एकटा असला काय किंवा आघाडीत असला काय, नेहमीच महत्त्वाची राहील. राहुल गांधी यांना इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून जी प्रतिष्ठा मिळेल त्यापेक्षा काँग्रेस नेते म्हणून कितीतरी अधिक प्रतिष्ठा मिळेल, असा दावाही त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने चांगले यश मिळवले. सत्ताधारी भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात आघाडीला यश आले. मात्र, नंतर झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत हे यश टिकले नाही. विशेषत: महाराष्ट्रात आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. शिवाय, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून संधी मिळाली तर आघाडीचे नेतृत्व करण्याची तयारी दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर मणिशंकर अय्यर यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.