जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रियंका यांनी हा हल्ला सुरक्षेतील गंभीर चूक असल्याचं म्हणत या हल्ल्याला कोण जबाबदार आहे असा सवाल देखील उपस्थित केला आहे. "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले होते, परंतु सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं. तेथे कोणतीही सुरक्षाव्यवस्था नव्हती."
"नागरिकांची सुरक्षा ही संरक्षणमंत्र्यांची जबाबदारी नाही? ती गृहमंत्र्यांची जबाबदारी नाही का?" असं म्हणत निशाणा साधला आहे. टीआरएफच्या स्थापनेचा, त्यांच्या कारवायांचा आणि दहशतवादी संघटनांचा उल्लेख करून प्रियंका गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आणि म्हटलं की, सरकारची अशी कोणतीही एजन्सी नाही जिला असा भयानक हल्ला नियोजित असल्याची माहिती मिळेल. हे एजन्सींचं अपयश आहे की नाही? हे मोठं अपयश आहे.
"बैसरन खोऱ्यातील या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने (जी पाकिस्तान समर्थित लष्कर-ए-तोयबाचा भाग आहे) घेतली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माच्या आधारावर लक्ष्य केलं आणि अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर हा हल्ला काश्मीरमधील नागरिकांवर झालेला सर्वात घातक हल्ला मानला जातो" असंही प्रियंका यांनी म्हटलं.
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कानपूरच्या शुभम द्विवेदीचा प्रियंका गांधींनी उल्लेख केला. "शुभम त्याच्या कुटुंबासह पहलगामच्या सुंदर दऱ्यांचा आनंद घेण्यासाठी गेला होता, परंतु दहशतवाद्यांनी शुभमला त्याच्या पत्नीसमोर गोळ्या घातल्या. शुभमसारखे अनेक लोक शांत काश्मीरच्या सरकारच्या दाव्यांवर विश्वास ठेवून तिथे गेले होते, परंतु त्यांना सुरक्षा मिळाली नाही" असं देखील प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.