गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला अपयश मिळाले आहे. त्यामुळे आता काँग्रेसने पक्षाच्या संघटनेत फेरबदल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नवीन टीम बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार आणि पुढील वर्षात होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची समीकरणे लक्षात घेता काँग्रेसकडून संघटनेत फेरबदल करण्यात येत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल हे आपल्या पदावर कायम राहतील. तर बिहार, राजस्थान, पंजाब, हरियाणा, तेलंगणा आणि आसाममध्ये प्रभारी बदलले जाऊ शकतात. याचबरोबर, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, बिहार आणि उत्तराखंड या राज्यांचे प्रदेशाध्यक्षही बदलले जाऊ शकतात.
दुसरीकडे, पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांना संघटनेतून बाहेर केले जाऊ शकते. तसेच, गुलाम अहमद मीर हे काश्मीरमधील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते असल्याने त्यांच्याकडील झारखंडमधील जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते. याशिवाय, भूपेश बघेल यांना सरचिटणीस बनवून संघटनेत आणले जाऊ शकते. तर मीनाक्षी नटराजन, सचिन राव, अजय कुमार लल्लू,वामशी रेड्डी, कृष्णा अलावुरु यांसारख्या नेत्यांना संघटनेत नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभवाचा सामना करावा लागला. याआधीही हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसला अपयश मिळाले. तसेच, यापूर्वी लोकसभा निवडणुकीत सुद्धा काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे आता काँग्रेसने पक्षाच्या संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.