Priyanka Gandhi on PM Modi Constitution Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोकसभेत संविधानावर चर्चा केली. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मात्र लोकसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंटाळवाणे भाषण केल्याचा आरोप काँग्रेसने शनिवारी केला. पंतप्रधान मोदींनी मांडलेले ११ ठराव पोकळ असल्याचेही काँग्रेस म्हटले आहे. दुसरीकडे काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनीही पंतप्रधान मोदींच्या भाषणावरुन निशाणा साधला. पंतप्रधान मोदींचे भाषणा गणिताच्या वर्गासारखे वाटत असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटलं.
लोकसभेतील संविधानावरील दोन दिवसीय चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने दुरुस्त्या करून संविधानाला वारंवार घायाळ केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. राज्यघटनेवर हल्ले चढविण्याची एकही संधी नेहरू-गांधी कुटुंबाने सोडलेली नाही, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. यावरुन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी पंतप्रधानांच्या भाषणाला कंटाळवाणे म्हटलं आहे.
"पंतप्रधान काहीही नवीन किंवा रचनात्मक बोलले नाहीत. त्यांचे भाषण मला कंटाळवाणे वाटले. अनेक दशकांनंतर मला वाटले की मी शाळेत गणिताच्या दुहेरी तासाला बसले होते. नड्डाजी हात चोळत होते, जेव्हा पंतप्रधानांनी त्यांना पाहिले तेव्हा ते ऐकत असल्यासारखे वागू लागले, अमित शाहजी त्यांच्या डोक्याला हात लावत आहेत. मागे बसलेले पियुष गोयल जी झोपणार आहेत असे दिसत होते," असं प्रियांका गांधी म्हणाल्या.
"मला वाटले की पंतप्रधान काहीतरी नवीन बोलतील, पण त्यांनी ११ पोकळ आश्वासने दिली. भ्रष्टाचाराबाबत झीरो टॉलरन्स असेल, तर त्यांनी किमान अदानींवर चर्चा करावी," असंही प्रियांका गांधी म्हणाल्या.
दरम्यान, संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासावर सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी नेहरू-गांधी कुटुंबावरही निशाणा साधला आणि या कुटुंबाने प्रत्येक स्तरावर राज्यघटनेला आव्हान दिल्याचा आरोप केला. "देशात नेहरू- गांधी कुटुंबाने ५५ वर्षे राज्य केले. नेहरू-गांधी कुटुंबाच्या आताच्या वंशजांनीही राज्यघटनेशी खेळ चालविला आहे. काँग्रेस सरकारने देशाचे कारागृहात रूपांतर केले होते, तर न्यायायंत्रणेचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. राजीव गांधी यांनीही राज्यघटनेमध्ये दुरुस्त्या केल्या. काँग्रेसवर लागलेला कलंक कधीही पुसला जाणार नाही," अशी टीका पंतप्रधान मोदींनी केला.