काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती गुरुवारी (२० फेब्रुवारी) अचानक खालावल्याने त्यांना सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांची प्रकृती सध्या व्यवस्थित आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे आणि उद्या अर्थात शुक्रवारी (२१ फेब्रुवारी २०२५) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. डिसेंबर २०२४ मध्ये सोनिया गांधी ७८ वर्षांच्या झाल्या आहेत.डॉक्टर म्हणाले, चिंतेचे कारण नाही -पीटीआय ने दिलेल्या वृत्तानुसार, गंगा राम रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप म्हणाले, "पोटाच्या काही समस्येमुळे सोनिया गांधी यांना दाखल करण्यात आले होते. तथापि, काळजी करण्यासारखे काहीही नाही. त्यांना शुक्रवारी सकाळपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. त्या डॉ. समीरन नंदी यांच्या देखरेखीखाली आहेत." गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातही झाल्या होत्या रुग्णालयात दाखल -सोनिया गांधी डिसेंबर २०२४ मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे कर्नाटकातील बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या (CWC) बैठकीला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. सप्टेंबर २०२४ मध्येही सोनिया गांधी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांना हलका ताप आला होता. मार्च २०२४ मध्येही सोनिया गांधी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, दुसऱ्या दिवशीच एक मेडिकल बुलेटिन जारी करून त्या पूर्णपणे ठणठणीत असल्याचे सांगण्यात आले होते.
सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक खालावली, दिल्लीतील गंगा राम रुग्णालात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 23:42 IST