लखनऊ : नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेशातील एका महिला पोलिसाने आपला गळा दाबला, तसेच आपणास धक्का देऊन खाली पाडले, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी केला.प्रियांका गांधी यांनी पत्रकारांना सांगितले की, नागरिकत्व कायद्याच्या विरोधात करण्यात आलेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी पोलिसांनी सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी एस. आर. दारापुरी यांना विनाकारण अटक केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मी त्यांच्या घरी जात होते. काँग्रेसच्या राज्य मुख्यालयातून मी बाहेर पडले. लोहिया चौकात आम्हाला पोलिसांनी अडवले. मी गाडीतून उतरून पायी चालू लागले, तेव्हा मला पोलिसांनी घेरले. एका महिला पोलिसाने माझा गळा दाबला. मला धक्का दिला. त्यामुळे मी पडले. पुढे गेल्यानंतर मला पुन्हा पकडण्यात आले. मी एका कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसून जाऊ लागले, तेव्हा त्यालाही पाडण्यात आले. प्रियांका गांधी यांनी सांगितले की, ७७ वर्षीय दारापुरी यांनी नागरिकत्व कायद्याला विरोध करणारी शांततापूर्ण पोस्ट फेसबुकवर टाकली होती. तरीही त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची पत्नी आजारी आहे. प्रियांका गांधी यांनी आपल्या फेसबुक पेजवरही हीच घटना लिहिली आहे.
पोलिसाने माझा गळा दाबला - प्रियांका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2019 06:31 IST