Gujarat Congo fever: गुजरातमधील जामनगरमध्ये क्रिमियन-काँगो हेमोरेजिक फिव्हरमुळे एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. काँगो फिव्हर नावाच्या आजाराने या व्यक्तीचे निधन झाल्याचे समोर आलं आहे. गेल्या पाच वर्षांत या संसर्गामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. मोहनभाई असे या व्यक्तीचे नाव असून तो पशुपालक होता. २१ जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि २७ जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
गेल्या वर्षी गुजरातमध्ये लखपत तालुक्यात एका अज्ञात आजाराने १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता काँगो फिव्हरमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. मोहनभाई यांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. तिथेच विषाणूची ओळख पटवण्यात आली. जामनगर मेडिकल कॉलेजचे अतिरिक्त डीन डॉ. एस.एस. चटर्जी यांनी म्हटलं की शहरात गेल्या पाच वर्षांतील ही पहिलीच घटना आहे.
मोहनभाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या निवासस्थानाजवळील परिसरात आरोग्य विभागाने दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. ही प्रकरणं वाढू नये यासाठीअधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला आहे. "या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात. संसर्ग झाल्यानंतर दोन ते चार दिवसांनी निद्रानाश, नैराश्य आणि पोटदुखी आणि तोंड, घसा आणि त्वचेवर पुरळ येणे ही इतर लक्षणे आहेत," असे आरोग्य विभागाने म्हटलं.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, क्रिमियन-काँगो रक्तस्रावी तापाच्या विषाणूमुळे गंभीर विषाणूजन्य रक्तस्रावी तापाचा प्रादुर्भाव होतो. त्याचा मृत्यूदर ४० टक्क्यांपर्यंत आहे आणि सध्या त्याची कोणतीही लस नाही. हा विषाणू प्रामुख्याने गोचीड आणि पाळीव प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरू शकतो. या विषाणूने संक्रमित झालेल्या व्यक्तींच्या रक्त, स्राव, अवयव किंवा इतर शारीरिक द्रवपदार्थांशी जवळच्या संपर्कामुळेही माणसांमधून माणसांमध्ये संसर्ग पसरु शकतो.