नवी दिल्ली : बिहार मतदारयाद्या पुनरावलोकनावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सुरू असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्यसभेत सरकारविरुद्ध आक्रमक सदस्यांना रोखण्यासाठी थेट कमांडो बोलावण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी म्हणाले.
‘आज कमांडो तैनात केले, कुणी सीआयएसएफ असल्याचे सांगत आहेत. या कमांडोंनी सदस्यांना सभागृहातील कर्मचाऱ्यांना भेटण्यास मज्जाव केला’, असे तिवारी म्हणाले. विरोधी पक्षातील महिला सदस्यांना या जवानांनी बळाचा वापर करून रोखल्याचा आरोपही विरोधी पक्षातील सदस्यांनी केला आहे.
मंत्री रिजिजूंचे स्पष्टीकरण
स्पष्टीकरण देताना सांसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नमूद केले की, जे खासदार अत्यंत आक्रमक होते आणि बळजबरी सभापतींच्या आसनासमोर येण्याचा प्रयत्न करीत होते त्यांनाच जवानांनी रोखले.
उपाध्यक्षांना खरगे यांचे पत्र
कमांडो तैनात करण्याचा निषेध करून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभागृहाचे उपाध्यक्ष हरिवंश यांना पत्र लिहून हा प्रकार आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे.
लोकसभेत पुन्हा ‘बिहार’, सोमवारपर्यंत तहकूब
बिहारमधील मतदारयाद्या पुनरावलोकनावरून संसदेत गदरोळ कायम आहे. विरोधी पक्षाचे सदस्य सभापतींच्या आसनासमोर एकत्रित आले. ‘एसआयआर’चा निर्णय मागे घ्यावा म्हणून या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. यावेळी काही सदस्यांनी बॅनरही फडकावले. इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी शुक्रवारीही संसदेबाहेर मकरद्वारवर निदर्शने केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यावेळी उपस्थित होते.