नवी दिल्ली - उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांच्यावर सध्या वादग्रस्त विधानामुळे जोरदार टीका होत आहे. एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केलं असून यामुळे नवा वाद निर्माण झाला. रावत आपल्या एका विधानामुळे खूपच चर्चेत आले आहेत. याच दरम्यान आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. रावत यांनी "कोरोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?" असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे. धान्यासाठी अधिक मुलं जन्माला घालण्याच्या विधानाने आता पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नैनीताल जिल्ह्यातील रामनगरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान धान्यवाटपाविषयी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. "कोरोना काळात प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रती सदस्य 5 किलो धान्य मिळाले आहे. ज्यांच्या घरात 10 सदस्य आहेत त्यांना 50 किलो धान्य मिळालं. तसेच ज्यांच्या घरात 20 सदस्य आहेत त्यांना एक क्विंटल धान्य मिळालं. ज्या घरात 2 सदस्य आहेत त्यांना केवळ 10 किलो धान्य मिळाले. अनेक लोकांनी हे धान्य साठवलं आणि ते विकलं" असं रावत यांनी म्हटलं आहे.
"आपल्याकडे वेळ असताना दोनच मुलांना जन्म दिल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटेल"
"मी असा चांगला तांदुळ कधीही खालेला नाही. आता याचा दोष कुणाला द्यायचा? आपल्याकडे वेळ असताना आपण दोनच मुलांना जन्म दिल्याबद्दल आता तुम्हाला वाईट वाटेल. आपण 20 मुलांना जन्म का दिला नाही असंही तुम्हाला वाटत असेल" असंही तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधी आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत" असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं होतं. यानंतर सर्वांनी यावरून निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. महिला नेत्यांनी यावरून निशाणा साधत टीकास्त्र सोडलं आहे. मात्र टीका झाल्यानंतरही रावत यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे.
"...तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोध"; जोरदार टीकेनंतरही तीरथ सिंह रावत आपल्या विधानावर ठाम
तीरथ सिंह रावत यांनी फाटक्या जीन्सबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर आता पुन्हा एकदा आपली प्रतिक्रिया दिली आहे. "आपला महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही पण तरीही फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध आहेच" असं रावत यांनी म्हटलं आहे. सर्वच स्तरातून टीका होत असताना रावत यांना त्यांच्या विधानाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला महिलांनी फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध कायम असल्याचं म्हटलं आहे. ट्विटरवर सध्या RippedJeans हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होत आहे.
बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी हे विधान केलं होतं. मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात असं देखील ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला. "एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला."
"महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असं नव्हतं" असंही रावत यांनी म्हटलं आहे. तसेच तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल असं देखील रावत यांनी म्हटलं आहे. काही दिवसांवपूर्वी रावत यांनी पंतप्रधान मोदींची तुलना ही प्रभू रामासोबत केली होती.