CM Devendra Fadnavis Pahalgam Terrorist Attack: मंगळवारी दुपारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात अनेक पर्यटकाचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारले आणि नंतर त्याच्या डोक्यात गोळी झाडली आणि गोळीबार करत पळून गेले. लष्कर-ए-तोयबाच्या द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून दोन पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये बेसरन परिसरात दहशतवाद्यांनी अचानक पर्यटकांवर गोळीबार सुरू केल्याने गोंधळ उडाला. या दुर्दैवी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर २० जण जखमी झाले. जखमींमध्ये पर्यटक आणि स्थानिक दोघेही आहेत. या हल्ल्यात महाराष्ट्रातील काही पर्यटक देखील जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील दोन पर्यटक मृत्यूमुखी पडल्याची माहिती दिली. तर दोन पर्यटक गंभीर जखमी आहेत.
"आता जी काही यादी आमच्याकडे आली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत तर काही जखमी देखील आहेत. तिथल्या लोकांना तिथले प्रशासन आणि आम्ही देखील मदत करत आहोत. कुठल्याही प्रकारे अशा प्रकारच्या शक्तींचा नायनाट केल्याशिवाय भारत थांबणार नाही असा आम्हाला विश्वास आहे," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुण्यातील जखमींबाबत माहिती देण्याची सुप्रिया सुळेंची विनंती
या हल्ल्यात पुण्यातील काही पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर आली असून खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याबाबत माहिती देण्याची विनंती मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडे केली आहे. "पहलगाम गोळीबार घटनेत आज जखमी झालेल्या पुण्यातील खालील लोकांना तात्काळ वैद्यकीय मदत आणि आधार देण्याची ओमर अब्दुल्ला यांना विनंती: आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे (गोळीबारात जखमी), कौस्तुभ गणबोटे (गोळीबारात जखमी), आणि संगीता गाबोटे. कुटुंबाने त्यांच्या प्रकृतीबद्दल स्पष्टता देण्याची विनंती केली आहे," असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.