बिहारमध्ये साऱ्यांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्याचअनुषंगाने बिहारच्या राजकारणात खूप गोंधळ उडाला आहे. विरोधी पक्ष आणि सरकार एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत. लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सततच्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, गुन्हेगारी नियंत्रणाबाहेर गेलेल्या सरकारला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खुनाच्या बातम्या येत आहेत. गेल्या एका महिन्यात ५० हून अधिक हत्येची प्रकरणे नोंदवली गेली. दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारामुळे आणि रुग्णालयात झालेल्या हत्येमुळे लोक घाबरले आहेत. यामुळेच आता सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. याचदरम्यान, सरकारला पाठिंबा देणारे राजकीय पक्षही आता संतप्त झाल्याचे दिसत आहे.
प्रशासन गुन्हेगारांपुढे हतबल
बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले, "ज्या पद्धतीने गुन्हे घडत आहेत, त्यामुळे प्रशासन पूर्णपणे गुन्हेगारांपुढे नतमस्कत झाल्याचे दिसत आहे. या घटनेचा निषेध करणे आवश्यक आहे. पण त्याआधी असा प्रश्न आहे की, अशा घटना का घडत आहेत? यावर बोलणे महत्त्वाचे आहे. गुन्ह्यांची मालिका सुरू आहे. जर ती अशीच सुरू राहिली, तर परिस्थिती आणखी भयानक होईल. बिहार आता सरकारच्या नियंत्रणात राहिलेले नाही. लोक भयंकर कंटाळले आहेत. मला दुःख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय, जिथे गुन्हेगारी नियंत्रणाबाहेर गेली आहे."
"बिहारमधील गुन्हेगारी घटनांमागे निवडणुकांचे समीकरण असल्याचे नाकारता येणार नाही. हे सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र असू शकते, परंतु काहीही झाले, तरीही त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. या सगळ्यामध्ये मी सरकारला वेळेवर कारवाई करण्याची विनंती करतो," असेही चिराग पासवान म्हणाले.
चिराग पासवान गेल्या काही दिवसांपासून सरकारवर सतत प्रश्न उपस्थित करत आहेत. यापूर्वी चिराग यांच्या पक्षाच्या इतर खासदारांनीही कायदा आणि सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले होते आणि उत्तर प्रदेशच्या योगी सरकारकडून धडा घेण्याचा सल्ला दिला होता.