भारताला ईशान्येकडील राज्यांना जोडणारा भूभाग म्हणजेच अत्यंत निमुळता प्रदेश असलेला चिकन नेक आहे. या राज्यांवर चीनचा डोळा आहे. कारण ही राज्ये भारतापासून लांब तर आहेतच परंतू बांगलादेशच्या पलिकडे आणि चीन-भुटान-म्यानमारला जोडून आहेत. या चिकन नेकजवळ काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना बांगलादेशने नेले होते. ही भारतासाठी चिंतेची बाब असतानाच आता आणखी एक मोठी घडामोड समोर येत आहे. या चिकन नेकजवळ चीनला हस्तक्षेप करण्यास देण्याचे कारस्थान बांगलादेश रचत आहे.
बांगलादेशची धुरा हाती घेतल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी भारतविरोधी कृत्ये करण्यास सुरुवात केली आहे. आता तर त्यांनी तिस्ता प्रोजेक्टमध्ये चीनला सहभागी करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. तिस्ता नदीच्या संरक्षण आणि नियोजनासाठीच्या विविध योजनांसाठी बांगलादेश चीनला त्यात सहभागी करण्याची शक्यता असलेले वृत्त टेलिग्राफने दिले आहे. युनूस यांनी यासाठी लोकांची सहमती मिळविण्यासाठी सार्वजनिक सुनावणीचा प्रस्ताव ठेवला आहे.
ही नदी सिक्कीममधून उगम पावते आणि हिमालयीन राज्य आणि उत्तर बंगालच्या काही भागांमधून सुमारे ३०५ किमी अंतर पार करून बांगलादेशात प्रवेश करते. तिस्ता प्रकल्पावरून भारत आणि बांगलादेशमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरु आहे. याचा फायदा आता युनूस सरकार घेणार आहे. शेख हसीना यांच्या सरकारने चीनला या प्रकल्पापासून दूर ठेवले होते परंतू युनूस चीनला रेड कार्पेट घालत आहेत. हसिना यांच्या काळातच चीनने याचा मास्टर प्लॅन तयार केला होता. परंतू, भारताने आक्षेप नोंदविल्यानंतर हसिना यांनी चीनचा प्लॅन बाजुला केला होता. तोच आता पुन्हा उकरण्यात आला असून त्यावर चर्चा करण्यात येत आहे. या प्लॅनवर चीनने दोन वर्षांचा वेळ मागितला आहे.
तिस्ता नदीच्या तटावर राहणाऱ्या लोकांची जनसुनावणी घेण्यात आली. सईदा रिजवाना हसन यांच्या हवाल्याने बांगलादेशी मीडियाने याबाबतची माहिती जाहीर केली आहे. सिलिगुडी कॉरिडॉरला भारताचे चिकन नेक म्हटले जाते. हा भाग नेपाळ आणि बांगलादेश दरम्यान स्थित आहे आणि संपूर्ण ईशान्येला देशाच्या उर्वरित भागाशी जोडतो. चीनला बांगलादेश सिलिगुडीपासून अवघ्या १०० किमीवर प्रवेश देणार आहे. हा भारतासाठी धोका मानला जात आहे.