नवी दिल्ली : चीनमध्ये काल 70 वा राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी चीनने साऱ्या जगाला कवेत घेणाऱ्या लांब पल्ल्याच्या घातक क्षेपणास्त्राचे प्रदर्शन केले. याचबरोबर फायटर विमान, सुपरसॉनिक ड्रोन आदी शस्त्रेही जगाला दाखविली. मात्र, याचवेळी भारतीय सीमेवर घुसखोरी करणाऱ्या चीनला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय सैन्य दिवसेंदिवस नवनवीन युद्धनीती स्वीकारत आहे. डोंगररांगांमध्ये युद्ध करण्याची क्षमताही आत्मसात करण्यास सुरूवात केली आहे. हिमालयासारख्या अजस्त्र डोंगररांगांवर युद्ध करण्यासाठी भारत एक मोठी बटालीयन उभी करत आहे. याला इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप्स (आयबीजी) असे नाव दिले असून चीनला कोणतीही खबर लागू न देता हिमाचल प्रदेशमध्ये युद्धसरावही सुरू केला आहे.
याशिवाय आयएएफ सी-17 ग्लोबमास्टर 3, सी-130 जे सुपर हर्क्यलस आणि एएन-32 ही लढाऊ विमाने या युद्धाभ्यासामध्ये सहभागी होणार आहेत. महत्वाचे म्हणजे येथे अमेरिकेचे नुकतेच भारतीय हवाईदलात सामिल झालेले चिनूक हेलिकॉप्टर सहभागी होणार आहे. हे हेलिकॉप्टर हॉवित्झर तोफही वाहून नेण्याची क्षमता ठेवते.
हिम विजय अभियान अशावेळी होत आहे, जेव्हा चीन राष्ट्रीय दिवस साजरा करत आहे. तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनफिंग या महिन्याच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चेन्नईमध्ये भेटणार आहेत. या आधी भारतीय सैन्याने पाकिस्तानला लष्करी ताकद दाखविण्यासाठी एप्रिलमध्ये चंडीमंदीर येथे युद्धसराव केला होता.