छत्तीसगड नगरपालिका निवडणुकीचे निकाल आज समोर आले आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत काँग्रेसचा पराभव केला आहे. छत्तीसगडमधील १० महानगरपालिका, ४९ नगरपरिषदा आणि ११४ नगरपंचायतींसाठी ११ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. भारतीय जनता पक्षाने सर्वच्या सर्व दहाही महानगरपालिकांवर आपला झेंडा फडकवला आहे. अर्थात काँग्रेसला महानगरपालिकेत खातेही उघडता आलेले नाही.
याशिवाय, ४९ नगरपालिकांमध्ये भाजपने ३५, तर काँग्रेसने ८ जागा जिंकल्या आहेत. महत्वाचे म्हमजे, या निवडणुकीत आम आदमी पक्षानेही नगरपालिकेत आपले खाते उघडले आहे. बोदरीमध्ये 'आप'ने एक जागा जिंकली आहे. तर अपक्षांच्या खात्यात ५ जागा गेल्या आहेत.
नगर पंचायतींसंदर्भात बोलायचे झाल्यास, येथेही भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. नगर पंचायतीच्या 114 जागांपैकी भाजपने 81, काँग्रेसने 22 तर बहुजन समाज पार्टीने 1 जागा जिंकली आहे. तर 10 जागा अपक्षांना मिळाल्या आहेत.
या निवडणुकांतील विजयासंदर्भात काय म्हणाले सीएम विष्णुदेव? -या निवडणुकांमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर प्रतिक्रिया देताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय म्हणाले, या निवडणुकीत अत्यंत चांगले निकाल लागले आहेत. भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवल्याबद्दल मी छत्तीसगडच्या मतदारांचे आभार मानतो. तसेच त्यांना खात्री देऊ इच्छितो की, आम्ही अटल विश्वास पत्रात दिलेली आश्वासने १००% पूर्ण करू.
10 हजारहून अधिक उमेदवारांनी नशीब आजमावले - निवडणूक अधिकाऱ्यांनी दिेलल्या माहिती नुसार, या निवडणुकीत 10 हजार हून अधिक उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. मतदानासाठी एकूण 5,970 मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. यांपैकी 1,531 मतदान केंद्रे संवेदनशील तर 132 केंद्रे अतिसंवेदनशील होते. या निवडणुकीत बसना नगर पंचायतीचे अध्यक्ष आणि विविध नगरपालिका संस्थांमधील ३२ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.