नवी दिल्ली - एकीकडे भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे तर दुसरीकडे आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने अजब ऑफर आणली आहे. आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्री आणि तेलुगु देशम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी जोडप्यांनी अधिक मुले जन्माला घालावी यासाठी प्रोत्साहन देत आहेत त्यातच त्यांच्या पक्षाच्या खासदाराने केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेशच्या विजयनगर लोकसभा मतदारसंघातील खासदार अप्पाला नायडू यांनी म्हटलं की, तिसरं अपत्य जन्माला घालणाऱ्या महिलेला ५० हजार रूपये दिले जातील. त्याशिवाय जी महिला मुलाला जन्म देईल तिला भेट म्हणून एक गाय दिली जाईल. मी माझ्या पगारातून महिलांना ही रक्कम बक्षीस म्हणून देईन असं त्यांनी सांगितले. त्यांचं हे विधान सोशल मीडियात खूप व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे नायडू यांचा व्हिडिओ टीडीपी नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत आहेत.
अप्पाला नायडू यांचं हे विधान आंध्र प्रदेशात लोकसंख्यावाढीसाठी क्रांतीकारी पाऊल ठरेल असं टीडीपी नेते म्हणत आहे. इतकेच नाही तर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही त्यांच्या खासदाराचं कौतुक केले आहे. जागतिक महिला दिनी विजयनगरच्या राजीव स्पोर्ट्स कपाऊंडमध्ये झालेल्या कार्यक्रमात खासदारांनी महिलांना ऑफर दिली. अलीकडेच दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दक्षिण भारतात घटणाऱ्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. कमी होत असलेली लोकसंख्या पुढील काळात आव्हानात्मक असेल. उत्तर प्रदेश, बिहार इथं युवा लोकसंख्या वाढतेय असंही चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं होते.
दरम्यान, याआधी मी कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देत होतो, परंतु आता माझे विचार बदलले असून मी लोकसंख्या वाढीच्या बाजूने आहे. भारत एक असा देश आहे, ज्याच्याकडे अधिक लोकसंख्येमुळे सर्वात फायदा आहे. जर आपण योग्य नियोजन केले तर भारत आणि भारतीयाना भविष्यात चांगले दिवस येतील. जागतिक पातळीवर सेवांमध्ये इतर देशांना भारतीयांवर निर्भर राहावे लागेल असं सांगत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी महिला कर्मचाऱ्यांना मातृत्व रजा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.