चाकूहल्ला करुन कापसाच्या व्यापार्यास लुटण्याचा प्रयत्न
By admin | Updated: January 8, 2016 02:13 IST
बीड बायपास रोडवरील घटना : लुटारूंच्या हल्ल्यात जखमी व्यापारी रुग्णालयात
चाकूहल्ला करुन कापसाच्या व्यापार्यास लुटण्याचा प्रयत्न
बीड बायपास रोडवरील घटना : लुटारूंच्या हल्ल्यात जखमी व्यापारी रुग्णालयातऔरंगाबाद : कापसाच्या व्यापार्यावर चाकूहल्ला करून लुटण्याचा प्रयत्न झाला, ही घटना बीड बायपास रोडवरील एका हॉटेलसमोर गुरुवारी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली. घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यापार्यास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गणेश कासलीवाल (रा. पाचोड) हे कापसाचे व्यापारी गुरुवारी रात्री बीड बायपास रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. याप्रसंगी तीन-चार जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवून हातातील बॅग हिसकावण्यास सुरुवात केली. कासलीवालने बॅग हातात पकडून ठेवल्यानंतर आरोपींनी बॅगवर चाकूने वार केले. त्यानंतरही त्यांनी बॅग न सोडल्याने शेवटी चाकू मारून जखमी केले. याप्रसंगी त्यांनी आरडाओरड केल्याने हॉटेलमधील ग्राहक आणि कर्मचारी बाहेर आल्याने आरोपी पळून गेले. दरम्यान, जखमी कासलीवाल यांना सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील फौजदार कल्याण शेळके आणि कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या चाकूची मूठ आणि कव्हर घटनास्थळी पडलेले होते. शिवाय एक स्कूटरही तेथे बेवारस अवस्थेत सापडले. हे स्कूटर कोणाचे याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. शिवाय या घटनेत किती रक्कम गेली अथवा नाही, याबाबतची माहिती कळू शकली नाही. दरम्यान, सहायक पोलीस आयुक्त रविकांत बुवा यांनी घटनास्थळाला भेट दिली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता.