मुद्द्याची गोष्ट : संकटांच्या निखाऱ्यांवर तेजाळलेल्या इंदिरा गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 02:30 PM2023-11-19T14:30:31+5:302023-11-19T14:30:54+5:30

व्ही. व्ही. गिरी जिंकल्याने पक्षांतर्गत संघर्षाच्या आगीत तेलच ओतले गेले. शिस्तभंगाची कारवाई करून इंदिरा गांधी यांना पक्षातूनच हाकलले. मात्र या यातून त्या सहीसलामत बाहेर पडल्या

Case in point: Indira Gandhi shining on the coals of adversity | मुद्द्याची गोष्ट : संकटांच्या निखाऱ्यांवर तेजाळलेल्या इंदिरा गांधी

मुद्द्याची गोष्ट : संकटांच्या निखाऱ्यांवर तेजाळलेल्या इंदिरा गांधी

कृष्णप्रताप सिंह, ज्येष्ठ पत्रकार

श्रीमती इंदिरा गांधी यांनी जनता पार्टीत फूट पाडली, मोरारजी सरकार पाडून काँग्रेसच्या पाठिंब्यावरील चौधरी चरणसिंग यांचे सरकार बनवले, नंतर त्यांना लोकसभेचे तोंडही पाहू न देता मध्यावधी निवडणुकांद्वारे पुन्हा काँग्रेसला सत्तेवर आणून पंतप्रधान पद मिळविले. इंदिरा गांधी यांच्या या धडाडीत आजच्या काँग्रेससाठी अनेक मोठे धडे आहेत. सर्वांत मोठा धडा हा आहे की, राजकारण हे रणनीतीचे युद्ध आहे आणि युद्ध कधीही कमजोर घोड्यावर बसून जिंकले जाऊ शकत नाही.


णत्याही मोठ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख ही संकटाच्या काळातच होते, असे म्हटले जाते. ‘लोह महिला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच देशाच्या एकमेव महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना ही कसोटी लावल्यास आढळते की, एकाच वेळी अनेक संकटांचा सामना केल्याने पंतप्रधानपद हे त्यांच्यासाठी काटेरी मुकुट ठरले होते. 
इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या आणि पुढच्याच वर्षी, १९६७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होऊन काँग्रेसच्या जागा घटल्या. त्यामुळे त्यांच्यासमोरील संकटात वाढ झाली. १९६९ पर्यंत पक्षातील अंतर्गत संघर्ष इतका विकोपाला गेला की, विभाजनाची स्थिती निर्माण झाली. त्यातच राष्ट्रपतीपदाची निवडणूक आली. इंदिरा गांधी यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष व्ही. व्ही. गिरी यांना समर्थन दिले. ‘अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करा’, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. 
व्ही. व्ही. गिरी जिंकल्याने पक्षांतर्गत संघर्षाच्या आगीत तेलच ओतले गेले. शिस्तभंगाची कारवाई करून इंदिरा गांधी यांना पक्षातूनच हाकलले. मात्र या यातून त्या सहीसलामत बाहेर पडल्या. त्यांनी सरकार वाचवलेच पण, १४ प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि संस्थानिकांचे तनखे बंद करण्यासारखे धाडसी निर्णय घेतले. नंतर ‘गरिबी हटाव’चा नारा देऊन त्यांनी १९७१ मध्ये नवीन काँग्रेसच्या ध्वजाखाली मुदतपूर्व निवडणुका घेतल्या व विजय प्राप्त केला. ‘रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत राष्ट्र मजबूत करण्याची महत्त्वाकांक्षा असणारी लोह महिला’ अशी आपली प्रतिमा त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत कायम ठेवली. 
१९७५ मध्ये रायबरेली लोकसभा मतदारसंघातील त्यांची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविल्यानंतर त्यांनी आणीबाणी लावली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह नागरिकांचे सर्व मूलभूत हक्क गोठवले. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले. यांचा उल्लेख होताच आजही काँग्रेसला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतो. मात्र, त्यांच्या नेतृत्वाखाली १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर मिळविलेला विजय आणि बांग्लादेशची निर्मिती यामुळे काँग्रेसला ‘संरक्षण’ही मिळते, हे विसरून चालणार नाही. 
नाराज मतदारांनी १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांना सत्तेवरून हटवले. विरोधकांना वाटले की, काँग्रेस कायमचीच संपली आहे. मात्र, त्यांनी अवघ्या अडीच वर्षात सत्तेत पुनरागमन केले. बिहारातील बेल्छी गावात दलितांच्या नृशंस संहारानंतर पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी दाखवलेले अद्भूत साहस तसेच उत्तर प्रदेशच्या आजमगढ लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळविण्यासाठी आखलेली रणनीती यामुळे इंदिरा गांधी यांची सत्तेत परत येण्याची वाट सुकर केली. तेव्हा घडले असे होते की, मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टीचे सरकार सत्तेवर येऊन अवघे काही महिनेच झाले असताना बिहारातील बेल्छी गावात १४ दलितांची हत्या करण्यात आली. पीडित परिवारांचे सांत्वन करण्यासाठी बेल्छी गावात पोहोचण्यासाठी इंदिरा गांधी यांनी आपले प्राणही संकटात घातले. श्रीमती गांधी यांचा बेल्छी दौरा ‘टर्निंग पॉइंट’  ठरला. परिवर्तनाची उरलेली पटकथा पुढील वर्षी एप्रिल-मे १९७८ मध्ये आजमगढ लोकसभा पोटनिवडणुकीत लिहिली गेली. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. सर्व जागा जनता पार्टीने जिंकल्या होत्या. आजमगढचे खासदार रामनरेश यादव मुख्यमंत्री झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली. या पोटनिवडणुकीत इंदिरा गांधी यांनी अत्यंत विचारपूर्वक रणनीती आखली. 

जनता पार्टीने रामनरेश यादव यांच्याच जातीच्या रामवचन यादव यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय मोहसिना किडवाई यांना उमेदवारी दिली. मतदारांचा मूड बदललेला पाहून जनता पार्टीत खळबळ उडाली. काँग्रेसचा मार्ग रोखण्यासाठी वरिष्ठ नेते जाॅर्ज फर्नांडिस आजमगढला पोहोचले. त्यांनी १० दिवस तेथेच मुक्काम ठोकला. अटलबिहारी वाजपेयी, चौधरी चरणसिंग, राज नारायण आणि मधू लिमये ही नेतेमंडळीही आली. तरीही काँग्रेस ३५ हजारपेक्षा अधिक मतांनी विजयी झाली. उत्तर भारतातील मतदारांवरील जनता पार्टीची मोहिनी उतरत असल्याचे संकेत म्हणून या विजयाकडे पाहिले गेले. त्यानंतर इंदिरा गांधी पुनरागमनासाठी दुप्पट उत्साहाने कामाला लागल्या. त्यानंतर नोव्हेंबर १९७८ मध्ये चिकमंगळूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी स्वत: पोटनिवडणूक लढवली आणि जिंकली. त्यामुळे चिडलेल्या मोरारजी सरकारने त्यांना लोकसभेतून निलंबित केले. इतकेच नव्हे, तर त्यांना अटकही करण्यात आली. मात्र त्यामुळे सरकारचे हसेच झाले. त्याचा फायदा इंदिरा गांधी यांना झाला.

अनेक दिव्ये पार करून 
बेल्छीला पोहोचल्या इंदिराजी...

१३ ऑगस्ट १९७७ रोजी इंदिरा गांधी  दिल्लीहून विमानाने पाटण्याला पोहोचल्या. बेल्छीला जाणे धोकादायक आहे, अशा सूचना मिळूनही त्या रवाना झाल्या. अत्यंत वाईट सडकेने मार्ग रोखला, तेव्हा त्या ट्रॅक्टरवर जाऊन बसल्या. रस्त्यात दुथडी भरून वाहणारी नदी लागली असता त्या बिना अंबारीच्या हत्तीच्या पाठीवर बसल्या व नदी पार केली. नंतर जवळपास कमरेएवढ्या पाण्यातून वाट काढत बेल्छी गाठले. त्या दलित परिवारांना भेटल्या, तेव्हा त्यांची स्थिती पाहून हे परिवारही गहिवरले. त्यांची साडी कमरेपर्यंत भिजलेली होती. दुसरी साडी मागवावी लागली. अत्यंत भावुक होऊन लोक त्यांना म्हणाले, ‘तुम्हाला मत न देऊन आम्ही मोठी चूक केली आहे.’

 

Web Title: Case in point: Indira Gandhi shining on the coals of adversity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.