तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यात एका खासगी रुग्णालयात एका महिला रुग्णावर बलात्कार करण्यात आल्याची लज्जास्पद घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डच्या एका २४ वर्षीय टेक्निशियनला अटक केली. पीडित तरुणीला टायफॉइड आणि उच्च तापाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी महाराष्ट्राची रहिवासी असून तिला टायफॉइड आणि उच्च तापाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तीन दिवसांपूर्वी पहाटेच्या वेळी आपत्कालीन वॉर्डच्या टेक्निशियनने पीडितेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीने आपत्कालीन वॉर्डमध्ये प्रवेश केल्यानंतर पीडितेच्या बेडजवळचे पडदे लावताना दिसला. याप्रकरणी पोलिसांनी टेक्निशियन अटक केली आहे.
दक्षिणा मूर्ती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, अहवालाची प्रतीक्षा आहे.पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.