केरळमधील काराकुलम येथे एका इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉलमध्ये मंगळवारी सकाळी एका तरुणाचा संशयास्पद स्थितीमधील मृतदेह सापडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, कॉलेज प्रशासनाने सांगितले की, सर्वप्रथम सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षकांनी मृतदेह पाहिला. घटनास्थळावर जळालेला टायर आणि पेट्रोलचा डबा सापडला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे जीवन संपवल्याचं प्रकरण असू शकतं. कॉलेजच्या मालकाचा फोन घटनास्थळावर सापडला आहे. तर त्याची कार इमारतीच्या बाहेर उभी होती. त्यामुळे हा मृतदेह कॉलेजच्या मालकाचा असू शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. मृताची ओळख पटवण्यासाठी डीएनए तपास करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेला रेकॉर्ड करण्यासाठी मोबाईल खुर्चीवर ठेवण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच परिसरामध्ये खळबळ उडाली. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री जी. आर. अनिल यांनी घटनास्थळाचा दौरा केला. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी आवश्यक ते आदेश पोलिसांना दिले आहेत. कॉलेजच्या मालकांच्या कुटुंबीयांकडेही आवश्यक ती चौकशी करण्यात येत आहे. तसेच पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टिमही घटनास्थळी दाखल झाली आहे.