राजधानी दिल्लीत एक भयंकर घटना घडली. रविवारी सकाळी मुकर्बा चौक उड्डाणपुलाजवळ एक भरधाव कार नियंत्रणाबाहेर गेली आणि उड्डाणपुलावरून थेट रेल्वे रुळावर पडली. त्यामुळे रेल्वे सेवा सुमारे १ तास विस्कळीत झाली. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रेल्वे पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने कार रेल्वे रुळावरून हटवण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, एक कार मुकर्बा चौक उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावरून पडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर, घटनास्थळी पोहोचल्यावर असे आढळून आले की, हैदरपूर मेट्रो स्टेशनसमोरील रिंग रोडखाली रेल्वे रुळावर एक मारुती सियाज कार पडल्याचे दिसली. नंतर अपघातस्थळावरून कार हटवण्यात आली आणि रेल्वे रुळ मोकळा करण्यात आला.
सचिन चौधरी (वय, ३५) असे चालकाचे नाव आहे. सचिन चौधरी हा गाझियाबादमधील प्रताप विहार रेल्वे कॉलनीमध्ये राहतो. या घटनेत चौधरीच्या खांद्यावर आणि चेहऱ्यावर किरकोळ दुखापत झाली. सचिन हा पीरागढीहून गाझियाबादला जात होता. कार रेल्वे ट्रॅकवर बांधलेल्या उड्डाणपुलाजवळ पोहोचली असता चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला.