नवी दिल्ली: पार्किंगमध्ये असलेली कार विहिरीत बुडाल्याचा धक्कादायक प्रकार गेल्याच महिन्यात मुंबईतल्या घाटकोपरमध्ये घडली होती. आता तसाच काहीसा प्रकार नवी दिल्लीतल्या द्वारकामध्ये पाहायला मिळाला आहे. रस्ता अचानक खचल्यानं तयार झालेल्या एका मोठ्या खड्ड्यात कार अडकली. भल्यामोठ्या खड्ड्यानं संपूर्ण कार आपल्यात सामावून घेतल्याचं दृश्य पाहून उपस्थितांना धक्काच बसला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सेक्टर-१८ मध्ये हा प्रकार घडला.
दिल्लीत मुसळधार पाऊस झाल्यानं आयटीओ आणि प्रल्हादपूरसह अनेक भागांत पाणी साचलं. त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. गुरुग्राममधील काही भागांत रस्त्यांवर पाणी तुंबलं होतं. मुसळधार पावसामुळे द्वारका परिसरातील सेक्टर १८ मध्ये रस्ता अचानक खचला. त्यामुळे एक कार खड्ड्यात कोसळली. ही कार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. ही कार एका पोलीस कर्मचाऱ्याची असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मात्र अद्याप तरी या माहितीला दुजोरा मिळालेला नाही.
दिल्लीत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसदिल्लीत आज मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. रिंग रोड, प्रगती मैदान, पालम, किराडी आणि रोहतक रोडवर पाणी साचलं होतं. प्रल्हादपूर अंडरपासजवळ भरपूर पाणी साचल्यानं वाहतूक वळवण्यात आली. किलोकरी, धौला कुवा, विकास मार्ग, आझादपूर भागातही जोरदार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली.