सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल, याचा काही नेम नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यात गाड्या चक्क रेल्वे प्लॅटफॉर्मवरून धावताना दिसत आहेत. प्लॅटफॉर्मवर असलेल्या प्रवाशांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद कसून हा व्हिडीओ जीआरपीच्या निष्काळजीपणावर प्रकाश टाकत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ भोपाळ रेल्वे स्थानकावरील असल्याचे सांगण्यात येत आहे. या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून शनिवारी सकाळी एक चारचाकीला धावताना प्रवाशांनी पाहिले. त्यानंतर काही वेळातच एक स्कूटरही तेथून जाताना दिसली. प्रवाशांनी दोन्ही घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्या. सुदैवाने, त्यावेळी कोणतीही रेल्वे प्लॅटफॉर्मवर नव्हती, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असते.
भोपाळ रेल्वे स्थानक राज्यातील सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. परंतु, या रेल्वे स्थानकावरील प्रवेशद्वार प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. कारण या प्रवेशद्वारातून कोणीही कधीही थेट प्लॅटफॉर्म क्रमांक ६, ५ आणि ४ वरून जाऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे, या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात नाहीत आणि बॅरिकेट लावण्यात आले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि तपास सुरू केला आहे.