नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट दर मिळणार आहे. मोदी सरकारनं आजच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेतला आहे. १४ पिकांसाठी किमान आधारभूत किंमत सरकारनं निश्चित केली आहे. कोरोना संकट काळातही शेतकऱ्यांनी धान्य पिकवलं. अडचणीच्या काळातही शेतकरी थांबला नाही, अशा शब्दांत कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी बळीराजाच्या कामाचं कौतुक केलं. १४ खरीप पिकांसाठीच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खर्चापेक्षा ५० ते ८३ टक्के अधिक उत्पन्न मिळेल, अशी माहिती तोमर यांनी दिली. कोरोना काळातील संकटांच्या दृष्टीनं आज मोदी सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मंत्रिमडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नरेंद्र तोमर आणि नितीन गडकरींनी दिली. शेतमालाला मिळणाऱ्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय बैठकीत घेण्याचं तोमर यांनी सांगितलं. 'मक्याची किमान आधारभूत किंमत ५३ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. तूर, मूग यांची आधारभूत किंमत ५८ टक्क्यांनी वाढवली गेली आहे,' अशी माहिती त्यांनी दिली. १४ पिकांच्या किमतीत ५० ते ८३ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचं तोमर म्हणाले. अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्जे घेतली आहेत. त्यांची परतफेड करण्यासाठी त्यांना कालावधी वाढवून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ऑगस्टपर्यंत कर्जाची परतफेड करता येईल, अशी माहिती तोमर यांनी दिली. कोरोना संकटातही शेतकऱ्यांनी बंपर उत्पादन केलं. यापैकी ३६० लाख मेट्रिक टन गहू, १६.०७ लाख मेट्रिक टन डाळ सरकारनं खरेदी केली आहे, असं तोमर यांनी सांगितलं.