ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ४ - यूपीएसएसीवरुन गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या वादाला केंद्र सरकारने पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. सी-सॅट रद्द केले जाणार नसले तरी त्यामधील इंग्रजी भाषेविषयीचे गूण मेरीटमध्ये ग्राह्य धरले जाणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
सोमवारी लोकसभेत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी यूपीएससी विषयावर लोकसभेत उत्तर दिले. सिंह म्हणाले, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेतील सी सॅटविषयातील इंग्रजी भाषेचे गूण मेरीटसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. सी सॅट रद्द केले जाणार नसून ऑगस्टमध्ये होणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा नियोजीत वेळेनुसारच होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
२०११ मध्ये सी-सॅटची अंमलबजावणी झाली होती. त्यामुळे २०११ मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना २०१५ मध्ये पुन्हा एकदा संधी दिली जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणाही जितेंद्र सिंह यांनी केली आहे.