West Bengal CM Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज(2 जानेवारी 2025) केंद्र सरकारवर टीका करताना BSF वर मोठा आरोप केला आहे. बीएसएफ इस्लामपूर, सीताई, चोपडा मार्गे बांग्लादेशी नागरिकांना भारतात घुसण्यासाठी मदत करत असल्याचा आरोप ममतांनी केला आहे. BSF च्या मदतीने बंगालमध्ये लोक घुसखोरी करत आहेत आणि बदनाम तृणमूलला केले जाते, असेही त्या म्हणाल्या.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मीडियाशी संवाद साधताना याला केंद्राचा 'नापाक' प्रयत्न म्हणत भाजपवर निशाणा साधला. तसेच, पश्चिम बंगाल अस्थिर करण्यासाठी बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमध्ये घुसण्यास मदत केल्याचा आरोप बीएसएफवर केला. त्यांच्या या आरोपामुळे नवा वाद निर्णाण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी ममतांचा भाचा आणि टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारवर अनेक आरोप केले आहेत.
अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, बांग्लादेशातील अत्याचार आणि अराजकता सर्वजण पाहत आहेत. केंद्र सरकारचे मौन संशयास्पद आहे. त्यांना (केंद्र सरकार) कोण रोखत आहे? आमच्या पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट आहे की, हा केंद्राचा विषय आहे. बाह्य किंवा परदेशी बाबी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. केंद्र सरकार कोणतीही पावले उचलेल, त्याला TMC पूर्ण पाठिंबा देईल. बांग्लादेशला समजेल, त्या शब्दात केंद्र सरकारने प्रत्युत्तर द्यावे, असेही ते यावेळी म्हणाले.