BPSC Exam 2024 : महाराष्ट्रातील MPSC प्रमाणे बिहारमध्ये BPSC ची परीक्षा घेतली जाते. पण, गेल्या काही दिवसांपासून विद्यीर्थी आणि सरकारमध्ये काही मुद्द्यांवरुन वाद सुरू आहे. शुक्रवारी(दि.13) देखील राजधानी पाटण्यात बीपीसीएस पेपर लीकच्या मुद्द्यावरुन विद्यार्थ्यांनी प्रचंड गोंधळ घातला. यावेळी पाटण्याचे जिल्हाधिकारी डॉ. चंद्रशेखर सिंह यांनी एका विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
BPSC प्रिलिम्स परीक्षेला बसण्यासाठी सूमारे 12 हजार उमेदवार पाटणा येथील बापू धाम परीक्षा केंद्रावर पोहोचले. परीक्षेदरम्यान उमेदवारांनी एकच गोंधळ घातला. पेपरचे सील आधीच उघडले असून, अर्धा तास उशिराने पेपर मिळाल्याचा आरोप उमेदवारांनी केला. काही उमेदवारांनी पेपरफुटीचा आरोपही केला. गोंधळानंतर पाटणा डीएम डॉ चंद्रशेखर सिंह परीक्षा केंद्रावर पोहोचले. डॉ. चंद्रशेखर सिंह उमेदवारांना समजावून सांगण्यासाठी आंदोलनस्थळी आले होते, पण जिल्हाधिकाऱ्यांना पाहताच उमेदवारांनी त्यांच्यावरही आरोप करण्यास सुरुवात केली. यावेळी रागाच्या भरात त्यांनी एका उमेदवाराला चापट मारली.
या गोंधळाबाबत जिल्हाधिकारी म्हणाले की, आज बीपीएससीची परीक्षा होती. कुम्हार येथील बापू परीक्षा केंद्रावर सुमारे 12,000 मुले आली होती. एका परीक्षा हॉलमध्ये 273 मुलांची बसण्याची व्यवस्था होती.
परीक्षा हॉलसाठी प्रत्येकी 12 च्या सेटमध्ये सुमारे 288 लिफाफे येणे अपेक्षित होते, पण बॉक्समध्ये 192 लिफापे आले. एका हॉलमधून दुसऱ्या हॉलमध्ये लिफाफे नेले जात होते, ज्यावर मुलांनी त्यावर आक्षेप घेतला. यामुळे परीक्षा सुरू होण्यास 10 ते 15 मिनिटे उशीर झाला. केंद्र अधीक्षकांनी समजावण्याचा प्रयत्न केला की, जास्त वेळ दिला जाईल. मात्र सुमारे 100 ते 150 मुलांनी गोंधळ घालून परीक्षेवर बहिष्कार टाकला, उर्वरित मुलांनी परीक्षा दिली आहे.