नवी दिल्ली : सौदी अरबस्तानातील दम्माम येथून कोचीकडे येत असलेल्या जेट एअरवेजच्या विमानात एका महिला प्रवाशाची सुखरूप प्रसूती होऊन एका मुलगा जन्माला आला. सूत्रांनी सांगितले की, या महिला प्रवाशास प्रसूतीच्या वेणा सुरु झाल्यावर विमानात वैद्यकीय आणिबाणी जाहीर केली गेली. प्रवाशांमध्ये कोणीही डॉक्टर नव्हता. मात्र सुटीत केरळला घरी परत निघालेली एक परिचारिका होती. तिच्या मदतीने विमान कर्मचाऱ्यांनी या महिलेची प्रसूती सुखरूपपणे पार पाडली. नियमानुसार शेजारच्या म्हणजे मुंबई विमानतळावर विमान उतरून बाळ-बाळंतीणीस शहरातील इस्पितळात धाडण्यात आले व विमान पुढील प्रवासासाठी कोचीला रवाना झाले.विमानात जन्माला येणाऱ्या मुलांना मोठ्या विमान कंपन्या आयुष्यभर मोफत विमान प्रवासाची सवलत देत असतात. रविवारी जन्मलेल्या बाळालाही जेट एअरवेज अशी सवलत देणार का, हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही.(वृत्तसंस्था)
विमानात जन्म
By admin | Updated: June 19, 2017 01:16 IST