गया : एका डॉक्टरला झाडाला बांधून त्याची पत्नी व १४ वर्षांची मुलगी यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बिहारच्या गया जिल्ह्यात घडला. बलात्कार करणाऱ्यांनी नंतर डॉक्टर व त्याच्या पत्नीकडील रोकड व दागिने लुटले व मगच ते पसार झाले. या प्रकारामुळे बिहारमधील कायदा व सुव्यवस्था पुन्हा बिघडल्याची चर्चा सुरू झाली असून, विरोधी पक्षांनी नितीशकुमार सरकारच्या निष्क्रियतेवर टीका केली आहे.ही घटना बुधवारी झाली असून, त्या प्रकरणातील २0 जणांना पोलिसांनी संशयावरून अटक केली आहे. डॉक्टरच्या पत्नीने त्यापैकी दोन जणांना आतापर्यंत ओळखले आहे. बलात्कार करताना व लुटताना त्यांनी चेहºयावर रुमाल बांधले होते. तरीही चेहरेपट्टी व आवाज या आधारे त्यांना त्या ओळखू शकल्या. याच भागांत याआधी बहीधा याच टोळक्याने दोन दुचाकीस्वारांना लुटले होते.गया जिल्ह्याच्या कोंच पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. डॉक्टर आपली पत्नी व मुलगी यांच्यासह दुचाकीवरून दुसºया गावी निघाले, तेव्हा अंधार पडला होता. त्याच वेळी लुटारूंच्या टोळक्याने त्यांची वाट अडवली. त्यांनी पतीला झाडाला बांधले. त्यांच्याकडील रोकड आणि दागिने लुटले. आणि डॉक्टरच्या समोरच देखत पत्नी व मुलीवर सामूहिक बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
डॉक्टरला झाडास बांधून पत्नी व मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 05:50 IST