सरकारी रुग्णालयांचा भोंगळ कारभार अनेकदा समोर येतो, पण गुजरातच्या राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो प्रकार घडला आहे, तो ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. काविळीवर उपचार घेण्यासाठी आलेल्या एका १८ वर्षीय तरुणीला चक्क 'ब्लड कॅन्सर' झाल्याचा चुकीचा रिपोर्ट देण्यात आला. एवढेच नाही, तर रुग्णालयाने तिला पुढील उपचारासाठी अहमदाबादला रेफर करण्याची तयारीही सुरू केली होती. एका नातेवाईकाच्या सतर्कतेमुळे हा गोंधळ समोर आला, अन्यथा एका निरोगी मुलीवर कॅन्सरचे उपचार सुरू झाले असते.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमका काय आहे प्रकार?
राजकोटमधील पारडी भागात राहणाऱ्या १८ वर्षीय देविकाला काविळ झाल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. केस पेपरवर तिचे वय स्पष्टपणे १८ वर्षे नोंदवण्यात आले होते. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी रक्ताच्या चाचणीचा सल्ला दिला. मात्र, जेव्हा लॅबमधून रिपोर्ट आला, तेव्हा कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या रिपोर्टवर देविकाचे वय १८ ऐवजी ४० वर्षे लिहिलेले होते आणि तिला 'ब्लड कॅन्सर' असल्याचे नमूद केले होते.
नातलगाच्या एका शंकेने वाचला जीव
मुलीला जीवघेणा आजार झाल्याचे ऐकून आई-वडील पूर्णपणे खचले होते. घरी पाहुणे आणि नातेवाईकही जमा झाले. दुसरीकडे, रुग्णालयातील डॉक्टरांनीही रिपोर्टची खातरजमा न करताच तिला तातडीने अहमदाबादला हलवण्याचा सल्ला दिला. दरम्यान, देविकाची विचारपूस करायला आलेल्या एका नातेवाईकाने रिपोर्ट नीट पाहिला. केस पेपरवर १८ वर्षे आणि रिपोर्टवर ४० वर्षे वय पाहून त्यांना संशय आला. त्यांनी डॉक्टरांना जाब विचारला असता लॅबमधील मोठी चूक उघड झाली.
नमुन्यांची झाली होती अदलाबदल
तपासणीअंती असे समोर आले की, देविकाचा रक्ताचा नमुना दुसऱ्या एका ४० वर्षीय महिलेच्या नमुन्याशी बदलला गेला होता. पुन्हा एकदा चाचणी केली असता देविकाला केवळ सामान्य काविळ असल्याचे स्पष्ट झाले. या एका चुकीमुळे देविकाच्या कुटुंबाला नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. जर वेळीच वय तपासले नसते, तर तिला कॅन्सरचे जड डोस, किमोथेरपी दिले गेले असते, ज्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.
तीन विभागांची चौकशी सुरू
या गंभीर निष्काळजीपणाची दखल सिव्हिल अधीक्षक मोनाली मांकडिया यांनी घेतली आहे. त्यांनी रक्त विभाग, प्रयोगशाळा आणि औषध विभाग अशा तिन्ही स्तरांवर चौकशीचे आदेश दिले आहेत. रक्ताचा नमुना घेण्यापासून ते तो तपासण्यापर्यंत कुठे चूक झाली, याचा शोध घेतला जात असून दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
Web Summary : Rajkot hospital wrongly diagnosed an 18-year-old jaundice patient with blood cancer due to a lab mix-up. Relatives noticed the age discrepancy (18 vs. 40 on the report), preventing unnecessary cancer treatment. An inquiry is underway.
Web Summary : राजकोट के अस्पताल में पीलिया से पीड़ित 18 वर्षीय लड़की को गलत तरीके से ब्लड कैंसर का पता चला। परिजनों ने उम्र में विसंगति देखी, जिससे अनावश्यक कैंसर उपचार टल गया। जांच जारी है।