हरीश गुप्ता, नवी दिल्लीमहाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना सामंजस्याने काम करण्यास सांगून नवनियुक्त भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेशी युतीचा विषय मार्गी लावला. मात्र हरियाणाबद्दल त्यांनी पूर्णत: वेगळी भूमिका घेतली आहे. शहा यांनी हरियाणा जनहित काँग्रेस (एचजेसी) नेते कुलदीप बिश्नोई यांना ९० जागांपैकी २५ जागेवर समाधान मानण्यास जवळजवळ अल्टिमेटम दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी प्रत्येकी ४५ जागा विधानसभा निवडणुकीत लढण्याचे ठरले होते, याचे स्मरण रालोआचा घटकपक्ष असलेल्या एचजेसीचे कुलदीप बिश्नोई यांनी भाजपा नेत्यांना करून दिले. मात्र, शहा यांनी लोकसभा निवडणुकीतील निकाल बघता हरयाणात जागा वाटपात बदल करण्यास भाजपा नेत्यांना सांगितले. लोकसभा निवडणुकीत भाजपाने सात जागा जिंकल्या. काँग्रेसला एक आणि इंडियन नॅशनल लोकदल यास दोन जागा मिळाल्या. कुलदीप बिश्नोई यांचा पराभव झाला होता. शहा यांनी बुधवारी हरियाणा भाजपा नेत्यांशी बंदद्वार चर्चा केली. यावेळी बिश्नोई यांना जागा वाटपाचे नवीन सूत्र मान्य करण्यास एक आठवड्याची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी हे सूत्र मान्य न केल्यास भाजपा स्वबळावर निवडणूक लढणार आहे.आगामी काळात महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीविषयी निर्णय घेण्यात आलेला नाही. बिश्नाई यांनी भाजपाची आॅफर मान्य न केल्यास सर्व ९० जागांवर निवडणूक लढण्यासाठी उमेदवारांची यादी तयार ठेवण्यास हरियाणा भाजपा अध्यक्ष राम बिलास शर्मा यांना सांगण्यात आले आहे. बिश्नोई यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून समोर न करण्याचे स्पष्ट संकेत देखील भाजपा नेतृत्त्वाने दिले आहेत.भाजपा नेते राम बिलास शर्मा, केंद्रीय नियोजन राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) राव इंदरजीत सिंह, भाजपा सचिव कॅप्टन अभिमन्यू किंवा खासदार कृष्णपाल गुज्जर किंवा अन्य कुणीही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून समोर आणले जाऊ नये, असे शहा यांनी स्पष्ट बजावले आहे.
हरियाणात भाजपाची नवी समीकरणे
By admin | Updated: July 19, 2014 02:30 IST