हरीश गुप्ता, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनवरील वातावरणाची पुनर्निर्मिती करण्याची योजना आखली आणि प्रजासत्ताक दिन समारंभादरम्यान तिन्ही दिवस त्याचा गजर होत राहिला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये निर्माण केलेल्या आपल्या रॉक स्टार प्रतिमेचा फायदा करून घेण्यात त्यांना जसे यश आले तसेच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीन दिवसांच्या भारत भेटीने निश्चितपणे भाजपा आणि संघ परिवाराचे हृदय जिंकले. भाजपा आणि संघ परिवाराने ओबामांच्या भारत भेटीमुळे खूश होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. ओबामांच्या भेटीने दिल्लीतील भाजप नेतृत्वात जबरदस्त जोश निर्माण झाला आहे. ओबामांच्या भेटीने भारताने गगनभरारी घेतली आहे. या उड्डाणात दिल्ली सामील झाली नाही तर उर्वरित देशापासून तिचा संपर्क विच्छेद होईल,’ असे टिष्ट्वट करून दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपला आनंद व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांनी ३१ जानेवारीऐवजी २५ जानेवारीला म्हणजे ज्या दिवशी ओबामांनी नवी दिल्लीत पाऊल ठेवले त्याच दिवशी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला, असे बेदींच्या या टिष्ट्वटवरून स्पष्ट झाले आहे. संयुक्तरीत्या ‘मन की बात’चे आयोजन करणे, प्रजासत्ताक दिनी राजघाट येथे पायी चालत जाणे आणि ओबामांचा त्यांच्या प्रथम नावाने संबोधणे, या सर्व गोष्टी पाहिल्या तर मोदी हे परिस्थितीचा फायदा करून घेण्यात कसे निपुण आहेत हे दिसते.ओबामांचा भारत दौरा ही मोदींनी राबविलेली व्यक्तिगत जनसंपर्क मोहीम असल्याचे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे तर प्रजासत्ताक दिन व ओबामांच्या भेटीचे भाजपाने राजकारण केल्याची टीका आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
भाजपा, विहिंप खूश
By admin | Updated: January 29, 2015 01:55 IST