कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसने मंगळवारी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यातील २९४ पैकी २९१ जागांवर तृणमूल काँग्रसने उमेदवार दिले आहेत. दार्जिलिंग या पर्वतीय क्षेत्रातील तीन जागा भारतीय गोरखा प्रजातांत्रिक मोर्चा (बीजीपीएम) या मित्र पक्षासाठी सोडल्याची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी दिली. ममता बॅनर्जी या भवनीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी व प्रदेशाध्यक्ष सुब्रत बख्शी यांच्यासोबत कोलकाता येथील कालीघाटीत उमेदवारांची यादी जाहीर केली. आम्ही २९२ जागांवर निवडणूक लढवणार असून यापैकी २२६ जागांवर विजय मिळवू, असा दावा उमेदवारी जाहीर करताना ममता बॅनर्जी यांनी केला. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी ही अत्यंत विचारपूर्वक व समतोल राखणाऱ्या राजकीय फेररचनेचे प्रतिबिंब आहे.
जवळपास १५ वर्षे सत्तेत राहिल्यामुळे निर्माण झालेल्या सत्ताविरोधी लाटेचा सामना यावेळी तृणमूलला करावा लागू शकतो. यासोबत भाजपच्या आक्रमक प्रचार मोहिमेची धार बोथट करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करत आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरणार आहे.
केरळसाठी काँग्रेसची ५५ उमेदवारांची यादी जाहीरविधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने केरळमध्ये मंगळवारी ५५ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत पक्षाने अनेक ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा संधी दिली असून, विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांना त्यांच्या सध्याच्या पारावूर मतदारसंघातूनच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांना पेरावूरमधून, तर ज्येष्ठ नेते के. मुरलीधरन यांना वट्टीयूरकाऊ मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या धर्माधम या मतदारसंघातून काँग्रेसने अब्दुल रशीद यांना मैदानात उतरवले आहे.
कोट्टायम जिल्ह्यात भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत ज्येष्ठ नेते पी. सी. जॉर्ज व त्यांचे पुत्र शोन जॉर्ज या पिता-पुत्राला विविध मतदारसंघांतून उमेदवारी दिली आहे.