बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या देदीप्यमान विजयानंतर एक आठवड्यार पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगे, ज्येष्ठ नेते के. एच. मुनियप्पा, के. जे. जॉर्ज, सतीश जारकीहोळी, रामालिंगा रेड्डी आणि बी. झेड. जमीर अहमद खान यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या गळ्यात उप मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. या शिवकुमार यांनीही शपथ घेतली आहे.
यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह बिगर भाजपपक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून एकीचा निर्धार व्यक्त केला. यावेळी (डावीकडून कॉंग्रेसचे के. सी. वेणुगोपाल, बिहारचे उपमुख्यमंत्री व राजद नेते तेजस्वी यादव, बिहारचे मुख्यमंत्री व जनता दल (संयुक्त) चे नेते नितीश कुमार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, भाकपाचे सरचिटणीस डी. राजा, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री व द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माकपा सरचिटणीस सीताराम येचुरी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, झारखंडचे मुख्यमंत्री व झामुमो नेते हेमंत सोरेन आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष जयंत चौधरी, मक्कल निधी मय्यमचे अध्यक्ष अभिनेते कमल हासन आदी नेतेही यावेळी उपस्थित होते.
पाच आश्वासनांना तत्त्वतः मान्यतामंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत काँग्रेसच्या पाच आश्वासनांना तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. सर्व घरांना २०० युनिट वीज मोफत, कुटुंब महिला प्रमुखाला २,००० रुपये मासिक मदत, दारिद्रयरेषेखालील कुटुंबाला १० किलो तांदूळ आणि बेरोजगार पदवीधराला तीन हजार रुपये भत्ता देण्यात येणार आहे.