काल झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंकर आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात भाजपाचं सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र दुसरीकडे ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यातील भाजपा सरकार संकटात सापडलं आहे. येथील भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या टिपरा मोठा पार्टीने (टीएमपी) भाजपासोबतची आघाडी तोडण्याची धमकी दिली आहे. जर आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर आम्ही सत्ता सोडायला तयार आहोत, असा इशारा टीएमपीचे प्रमुख प्रद्योत किशोर माणिक्य देववर्मा यांनी दिला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा सन्मान करतो, असेही त्यांनी सांगितले. आम्ही एक वर्ष वाट पाहिली. मात्र आता आमच्या मुलांचं आणि लोकांचं भविष्य अधांतरी आहे.
देववर्मा यांनी सांगितले की, आम्हाला सुरक्षा, जमीन, शिक्षण, ओळख, थेट फंडिंग आणि संस्कृतीबाबत अधिकार हवे आहेत. मात्र याबाबत आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नाही आहे. काही लोक आम्हाला दिलेलं वचन मोडण्याचा विचार करत आहेत, असं वाटतंय. बुघवारी आपल्या पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्त सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये देववर्मा यांनी ही विधानं केली आहेत.
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरामधील स्थानिक पक्ष असलेला टीएमपी स्वबळावर निवडणूक लढला होता. त्यांना १३ जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. त्यांनी सांगितले की, आम्हाला आमचे जे अधिकार देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, त्याची जर पूर्तता केली गेली नाही तर आम्ही सत्ता सोडण्यास तयार आहोत. जर आम्ही लोकांचं हित साधू शकत नसू तर आम्हाला सत्तेत राहण्याचं काहीही औचित्य नाही आहे. आमच्यासाठी राजकारण फार महत्त्वाचं नाही, तर आपल्या लोकांचे अधिकार अधिक महत्त्वाचे आहेत.