नवी दिल्ली: सध्या भाजपाकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विचारधारेबद्दल मार्गदर्शन दिलं जात आहे. विचारधारेशी प्रामाणिक राहा, अन्यथा परिणाम भोगा, असा स्पष्ट इशारा पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. विचारधारेच्या विरोधात गेल्यास पदावरुन हटवण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना भाजपाकडून प्रशिक्षणादरम्यान दिल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षकांकडून भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दरम्यान भाजपाचे 'पितामह' लालकृष्ण अडवाणी यांचं उदाहरण दिलं जात आहे. 'नवभारत टाइम्स'नं हे वृत्त दिलं आहे.कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान अडवाणींच्या २००५ च्या पाकिस्तान दौऱ्याची आठवण करुन दिली जात आहे. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांना धर्मनिरपेक्ष म्हटल्यानं अडवाणी यांना भाजपाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं होतं, हा संदर्भ भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना दिला जात आहे. पक्षातील कोणतीही व्यक्ती विचारधारेपेक्षा श्रेष्ठ नाही, अशा शब्दांमध्ये उत्तर प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष जे. पी. राठोड यांनी मार्गदर्शन शिबिरातील अडवाणींच्या उल्लेखावर भाष्य केलं.
...तर तुमची अवस्था अडवाणींसारखी होईल; भाजपाचा पदाधिकाऱ्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 10:31 IST