कोलकाता - लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला. भाजपाच्या या यशामध्ये पश्चिम बंगालमधील कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. बंगालमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत 18 जागा जिंकल्या. लोकसभेच्या निकालांचा विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतल्यास भाजपाने तब्बल 128 विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकेकाळी डाव्यांचा आणि आता तृणमूलचा गड असलेल्या बंगालमध्ये भाजपाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. 2011 मध्ये डाव्यांची सत्ता खालसा केल्यापासून बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व आहे. 2014 मध्ये भाजपाने तृणमूलसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी भाजपाला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला होता. तसेच अवघ्या 28 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाला आघाडी मिळाली होती. मात्र यावेळी भाजपाने जोरदार मुसंडी मारली असून, तब्बल 128 मतदारसंघात आघाडी घेतली आहे. दुसरीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला यावेळी 42 पैकी 22 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी तृणमूलला 214 मतदारसंघात आघाडी होती. पुढे दोन वर्षांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 211 जागा जिंकल्या होता. मात्र यावेळी तृणमूलची आघाडी 158 पर्यंत घसरली आहे. तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांनाही दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे.
बंगालमधील भगवी लाट ममता बॅनर्जींसाठी धोक्याची घंटा, विधानसभेचे गणित बिघडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 15:18 IST