बिहारच्या राजकारणासोबत तिथले वातावरणही सातत्याने बदलताना दिसत आहे. देशभरात उन्हाचा तडाखा बसत असताना बिहारमध्ये नुकतीच पावसाने हजेरी लावली होती. या पावसात २५ जणांना आपला जीव गमवावा लागला. मात्र त्याच्याआधी बिहारमध्ये तापमान ४० अंश सेल्सियलच्याही पुढे गेलं होतं. यादरम्यानच बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात एक विचित्र राजकीय चित्र पाहायला मिळाले आहे. कडाक्याचा उन्हाळा पडलेला असताना बिहारमध्ये एका मंत्र्यांने चक्क थंडीपासून वाचण्यासाठी वापऱ्यात येणारे ब्लँकेट वाटले आहेत. भाजपच्या या मंत्र्यांच्या प्रतापाची सध्या देशभरात चर्चा सुरु झाली आहे.
सध्या बिहारमध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली असून तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. असं असताना बिहार सरकारचे क्रीडा मंत्री आणि बच्छवाडा येथील भाजप आमदार सुरेंद्र मेहता यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात एक विचित्र काम केलं आहे. कडक उन्हात त्यांनी ७०० हून अधिक लोकांना ब्लँकेट वाटले. ब्लँकेट वाटपाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
६ एप्रिल रोजी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त, सुरेंद्र मेहता यांनी त्यांच्या बच्छवारा विधानसभा मतदारसंघातील मनसूरचक ब्लॉकमधील गोविंदपूर पंचायतीच्या अहियापूर गावात एक कार्यक्रम आयोजित केला. यावेळी त्यांनी शेकडो लोकांना ब्लँकेट वाटले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. क्रीडा मंत्र्यांसोबत अनेक स्थानिक भाजप नेतेही होते. सुरेंद्र मेहता यांनी स्वतः या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले, त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले.
"अंत्योदय आणि राष्ट्र उभारणीच्या भावनेने काम करणाऱ्या जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपच्या ४० व्या स्थापना दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बच्छवारा विधानसभा मतदारसंघातील गोविंदपूर पंचायत-२ मधील अहियापूर गावात लोकांना कपडे देऊन सन्मानित करण्यात आले. जय भाजपा, जय भारत माता,” असे या पोस्टमध्ये म्हटलं. पोस्टमध्ये सुरेंद्र मेहता यांनी कपड्याचा उल्लेख केला असला तरी लोकांना केवळ ब्लँकेटच वाटण्यात आले.
दरम्यान, तापमान ४० अंशांच्या आसपास असताना आणि लोक उष्णतेने त्रस्त असताना, क्रीडा मंत्र्यांनी ब्लँकेट वाटपाचा निर्णय घेतल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. नेटकऱ्यांनी यावरुन सुरेंद्र मेहता यांना फैलावर घेतलं आहे. हा निर्णय लोकांच्या गरजेनुसार घेतलाय की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असा सवाल एका नेटकऱ्याने केला. काहींनी याला विनोद म्हटलं, तर काहींनी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त हा दिखावा असल्याचे म्हटले.