बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील एका जीप चालकाच्या शौर्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. जीप ड्रायव्हर संतोष सिंह यांच्यावर रात्री उशीरा सशस्त्र हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. गोळी लागल्यावरही चालक ५ किलोमीटर जीप चालवून हॉस्पिटलमध्ये जातात. संतोष सिंह असं जखमी चालकाचं नाव असून ते धोबहन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हेमतपूर गावचे रहिवासी आहेत.
गोळीबारात जखमी झालेले चालक संतोष सिंह म्हणाले, बुधवारी संध्याकाळी धोबहन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुकुलपुरा गावातील मिठू साव यांच्याकडे एका कार्यक्रमाला जाण्यासाठी जीपमधून १५ जण बहारोनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामदताही गावात गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वजण आपापल्या जीपने परतत होते. त्यानंतर रात्री झौआ गावाजवळ बाईकवरून आलेल्या सशस्त्र गुन्हेगारांनी माझ्यावर गोळ्या झाडल्या. गोळी पोटात लागली.
ते पुढे म्हणाले, असे असूनही मी सुमारे ५ किलोमीटर गाडी चालवत राहिलो आणि सर्व लोकांना हल्लेखोरांपासून वाचवलं आणि त्यांना सुरक्षितपणे रुग्णालयात आणलं. जखमी अवस्थेत त्यांना आराह शहरातील बाबू बाजार येथील शांती मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिथे उपचार करण्यात आले. जखमी चालकाने पुढे सांगितलं की, तीन बाईकवर ९ गुन्हेगार होते आणि ते समोरून येत होते. ते येताच गाडी थांबवून गोळी झाडण्यात आली. का झाडली हे आम्हाला माहीत नाही, आम्ही कोणाला ओळखतही नाही.
घटनेची माहिती मिळताच एफएसएल टीमसह मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. घटनास्थळी पोहोचलेले जगदीशपूर एसडीपीओ राजीव चंद्र सिंह यांनी सांगितलं की, ही घटना रात्री १२ च्या सुमारास घडली. एका जीप चालकावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याचं सांगण्यात येत आहे.