मधुबनी: बिहरमध्ये आज सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कारने भरधाव वेगात चार जणांना चिरडले आहे. फुलपरास पोलीस ठाणे क्षेत्रता ही घटना घडली असून डीएम आणि त्यांचा ड्रायव्हर कार तिथेच टाकून पळाले आहेत. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
फुलपरास पुरवारी टोलाजवळ डीएमच्या कारने एका महिलेला आणि तिच्या मुलीला धडक दिली. यानंतर ही कार राष्ट्रीय महामार्गावर काम करणाऱ्या दोन मजुरांवर जाऊन धडकली. यानंतर कार रेलिंगला जाऊन आदळली. मृतांची ओळख पटलेली नसून यामध्ये रस्त्यावर रंगकाम करणारा मजूर, महिला आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
आज सकाळी डीएम विजय प्रकाश मीणा हे त्यांच्या स्टाफसह दरभंगाहून परतत होते. यावेळी एनएच ५७ वर त्यांच्या वाहनाने रस्त्याच्या बाजुला पट्ट्या रंगविणाऱ्या मजुराला उडविले. यानंतर त्यांची कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या दुसरीकडे जात महिला आणि एका मुलाला चिरडले. या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर आणखी एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. मधेपुरा जिल्हा प्रशासन यावर काही बोलण्यास असमर्थता दर्शवत आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, डीएमच्या कारमध्ये डीएम, ड्रायव्हर, एक अंगरक्षक आणि एक मुलगी होती. घटनेनंतर काही दुचाकी तेथे आल्या आणि त्यांना घेऊन गेल्या. नागरिकांनी रस्ता जाम केला आहे.